वडवळ नागनाथ : एकीकडे कुटुंबातील "आम्ही वेगळे राहू'चा कल समाजात वाढत असताना वडवळ नागनाथ (ता. चाकूर) येथील एक कुटुंब तिसऱ्या पिढीतही एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहे. या कुटुंबात तब्बल 35 जण एकत्र राहतात.
एका शतकापूर्वी वडवळ नागनाथ येथील माजी सरपंच (कै.) खंडेराव बळीराम लवटे-पाटील यांच्यापासून सुरू झालेल्या वंशविस्तारानंतर 35 जणांचे कुटुंब आज तिसऱ्या पिढीतही गुण्यागोविंदाने नांदत आहे.
या घराचे कुटुंबप्रमुख विवेकानंद लवटे-पाटील यांना वडिलोपार्जित पंचेचाळीस एकर जमीन. वडील (कै.) खंडेराव बळीराम लवटे-पाटील हे 1966 ला वडवळचे सरपंच झाले. त्यावेळी गावचे दळणवळण रेल्वेनेच व्हायचे. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गावातून घरणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करून गावात वीज आणल्याचे आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात. अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा, आपसातील प्रेम, जिव्हाळा व माणुसकीची संस्कृती जपणारा हा परिवार. मुळात (कै.) खंडेराव लवटे-पाटील यांना पाच मुली तर (कै.) शिवाजीराव पाटील, विवेकानंद पाटील व दयानंद पाटील ही तीन मुले. या तीन मुलांना पुढे सात मुले व तीन मुली झाल्या. मोठे भाऊ शिवाजीराव यांच्या आणि वहिनींच्या निधनानंतर या कुटुंबाची सर्व जबाबदारी विवेकानंद यांच्यावर पडली. यावेळी पित्याचे छत्र हरपलेल्या मोठ्या भावाच्या पाचही मुलांचा त्यांनी विवाह केला. कुटुंबात विवेकानंद यांचा शब्द प्रमाण मानला जातो.
सामाजिक क्षेत्राची आवड असलेल्या विवेकानंद यांना भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी येथील वटसिध्द नागनाथ आश्रमशाळेवर अधीक्षक म्हणून घेतले आणि लहान भाऊ दयानंद यांनी मोठ्या भावाची दोन मुले सोबत घेऊन गोविंदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी चालवून कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली. कुटुंबाला राजकीय वारसा असल्याने विवेकानंद यांनी 2007 मध्ये आपली पत्नी उषा लवटे-पाटील यांना वडवळ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले. पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या सभागृहात काम करूनही उषाताई आजही घरात व शेतातील कामांत सतत व्यस्त असतात. एका घरात दोन महिला एकत्र राहणे जमत नाही; परंतु लवटे-पाटील यांच्या कुटुंबात दोन सासू आणि पाच सुना अगदी मैत्रिणीसारख्या राहतात!
आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती. शेतात ऊस, हरभरा, तूर, गहू, टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाल्याची लागवड केली आहे. यासाठी सहा बैल, चार म्हशी, चार सालगडी आणि पाटीलकी असल्याने एक घोडीही आहे. घरकाम असो की, शेतातील काम असो प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेल्या कामात व्यस्त असतो.
अर्धा एकर घर अन् 25 हजारांचा खर्च
अर्धा एकर पसरलेल्या घरात महिलांनी दररोजचे सडा-सारवण, पाणी भरणे, देवपूजा, चहा, नाश्ता, स्वयंपाकापासून ते धुणे, भांडे आणि इतर सर्व कामे वाटून घेतली आहेत. दररोज किमान शंभर भाकरी व पंचवीस चपात्या कराव्या लागतात. आजही घरातील बच्चेकंपनी व मोठे सदस्य सकाळ-संध्याकाळ पंगतीला बसून जेवतात. महिन्याला सरासरी पाच कट्टे तांदूळ, पंधरा किलोचे चार डबे गोडेतेल, भाजीपाला व इतर चिल्लर किराणा व कपडा खरेदीसाठी अंदाजे पंचवीस हजार रुपये तर दवाखाना व शैक्षणिक खर्च वेगळा लागतो. यात कुटुंबातील सहा मुले लातूर व सोलापूरला शिक्षणासाठी राहतात, असे कुटुंबाचे कारभारी दयानंद पाटील यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.