गंगापूर - शहरातील मुक्तानंद महाविद्यालयात शनिवारी व रविवारी मराठवाडा साहित्य संमेलन रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाध्यक्षपदी नांदेडचे जेष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम असणार आहेत. आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकारातून गंगापूर नगरीत पहिल्यांदा असे मराठवाडा पातळीवरचे संमेलन होते आहे. माजी आमदार अँड. लक्ष्मणराव मनाळ संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
शनिवार सकाळी ८. ३० वाजता रमेश डोणगावकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन होईल. गंगापूर शहर ते कविवर्य ना.धों महानोर साहित्यनगरीपर्यंत भव्य ग्रंथदिंडी निघेल. सकाळी 10 वाजता पूर्व संमेलनाध्यक्ष डॉ.शेषराव मोहिते यांच्या हस्ते साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे ग्रंथनगरीचे उद्घाटन होईल. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार व संमेलनाध्यक्षपदी नांदेडचे जेष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते होईल.
दुपारी 1.30 वाजता महाष्ट्रातील निवडक नामवंत कवींचे कविसंमेलन देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या संमेलनात विविध विषयावर दोन दिवसांत पाच परिसंवाद संपन्न होणार असून प्राचार्य विठ्ठलराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ‘म्हणून मी लिहितो/लिहिते’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल.
यात शरद तांदळे, सुनीता बोर्डे, शाहू पाटोळे, आशा पैठणे, विजय पाथ्रीकर हे लेखक सहभागी आहेत. ‘सत्यशोधक चळवळीचे दीडशे वर्ष! या विषयावर दुसरा परिसंवाद होणार असून डॉ. प्रल्हाद लुलेकर त्याचे अध्यक्ष आहेत. संजय आवटे,संपत देसाई,डी.आर.शेळके,हंसराज भोसले असे वक्ते त्यात सहभागी असतील.
प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवाणींचे पक्षी’ या आत्मकथनावर परिचर्चा होणार असून चेतना सोनकांबळे, माणिक पुरी, रामनाथ वाढे, कमलाकर कांबळे हे चर्चक म्हणून चर्चा करतील. सायंकाळी भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगणार असून रवींद्र पांढरे, राम तरटे, राजेंद्र गहाळ, शारदा देशमुख, विलास सिंदगीकर हे कथाकार सहभागी असतील. रात्री 8 वाजता प्रा. राजेश सरकटे निर्मित ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ हा मराठवाड्यातील कवितेचा 800 वर्षांचा इतिहास मांडणारा काव्यगायनाचा कार्यक्रम संमेलनाचे आकर्षण आहे.
ना. धों. महानोर यांना सन्मान
काही महिन्यापूर्वीच जेष्ठ कवी ना.धों.महानोर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या साहित्यनगरीला त्यांचे नाव दिले आहे. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठास जगभरात ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळख निर्माण केलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तर दुसऱ्या व्यासपीठास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तिसऱ्या व्यासपीठास वैजापूर तालुक्यातील शिऊरचा संत बहेणाबाई यांचे व ग्रंथनगरीस साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे नाव तरुण पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून दिले आहे. गंगापूर सारख्या ग्रामीण भागात होणाऱ्या संमेलनातून या तालुक्यातील वाड्मयीन चळवळीला गती मिळणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.