अल्पावधित पर्यटकांचं आवडतं स्थान बनतंय नळदुर्गचा भुईकोट किल्ला; माहित करून घ्या इतिहास

naldurg fort
naldurg fort
Updated on

नळदुर्ग: पुराण काळात नळदुर्ग येथील राजा नळ व त्यांची पत्नी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबाचा बाणाईशी नळदुर्ग किल्ल्यात  विवाह झाल्याची आख्यायिका आहे. तर निजाम काळात सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण व भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते. १९०४ साली उस्मानाबाद शहरास जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर नळदुर्गचे महत्त्व कमी होत गेले मात्र अशा या नळदुर्ग शहरास भुईकोट किल्ल्यामुळे पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील बोरी नदीच्या किनाऱ्यावर नळदुर्ग शहर वसले आहे. नळदुर्ग १७.८२` उत्तर अक्षांश व ७६.३`पूर्व रेखांशावर असून समुद्र सपाटीपासून ५६६ मीटर उंचीवर पुणे - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर आहे.

नळ राजाने किल्ला बांधल्यामुळे नळदुर्गचे नाव या किल्ल्यावरून पडले. नळ राजाची सहाव्या शतकात सत्ता होती. नळराजाची पत्नी दमयंती ही श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती. या भक्तीमुळे श्री खंडोबाचा नळदुर्ग येथे बाणाईशी विवाह झाला. नळदुर्ग येथील मैलारपूर येथे आजही दरवर्षी पौष पोर्णिमेला श्री खंडोबाची यात्रा भरते. याञेस महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येतात. नळ राजानंतर नळदुर्गवर चालुक्य, यादव, खिलजी, तुघलक व अदिलशाह यांचीही सत्ता होती. अदिलशाहच्या काळात किल्ल्याचे नाव 'शहादुर्ग' असे करण्यात आले.

१६७७ मध्ये औरंगजेबाने किल्ला हस्तगत केला. १७२४ आसफशाही सुरू झाली. त्यास हैद्राबादचे निजाम म्हणून ओळखले जावू लागले, नळदुर्ग किल्ला निजामाकडे आला. तर १७५८ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी नळदुर्ग जिंकून किल्ल्यावर भगवा झेंडा फडकविला. नंतर काही काळात किल्ल्यावर निजामाने कब्जा केला. सन १९४८ साली सरदार वल्लभभाई पटेल  यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन पोलो' अंतर्गत भारतीय सैन्याने ऍक्शन घेतली व मराठवाड्यासह नळदुर्ग सन १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाला. सन १९५६ साली नळदुर्गमध्ये नगरपालिका अस्तित्वात आली.

नळदुर्गचे मुख्य वैशिष्ट्य भुईकोट किल्ला असला तरी श्री खंडोबाच्या मुख्य स्थान मैलारपूर, पौराणिक व महाराष्ट्र शासनाचा 'क'' वर्ग दर्जा प्राप्त निसर्गरम्य रामतीर्थ परिसर व राम मंदिर, नानीमाँ दर्गाह प्रसिध्द आहे. नळदुर्गपासून पाच किलोमीटर अंतरावर अणदुर येथे श्री खंडोबाचे मंदिर आहे. नळदुर्ग - अक्कलकोट मार्गावर नळदुर्ग पासून पाच किलोमीटर अंतरावर सेनासुभा जानोजीराजे रघोजी भोसले नागपूरकर यांची सतराव्या शतकातील समाधी आहे.

नळदुर्ग जवळील रामतीर्थ उच्च पातळी बंधाराही पर्यटकांसाठी आनंददायी ठरत आहे. या ठिकाणी पावसाळ्यात वाहणारा नैसर्गिक धबधबा आहे. यासह नळदुर्ग शहरात अमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत ठरत आहे तो राष्ट्रीय महामार्ग. शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ व महाराष्ट्रातील दोन मुख्य तीर्थक्षेञाना जोडणारा तुळजापूर- अक्कलकोट  राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ या नळदुर्ग शहरातून गेल्यामुळे शहराचे महत्व वाढले आहे. नळदुर्ग पासून श्री तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेञ असलेले तुळजापूर शहर ( ३० किमी ) स्वामी समर्थ महाराजांचे तीर्थक्षेञ अक्कलकोट ( ४० किमी ) शहर जवळ आहे.

नळदुर्ग शहराशी परिसरातील सत्तर लहान मोठी गावं, वाड्या वस्त्यां आर्थिक व्यवहाराने जोडली गेली आहेत. पोलीस ठाणे, पोष्ट कार्यालय, बँका, इतर साधने यामुळे या सत्तर गावांतील असंख्य नागरिक दररोज नळदुर्गला येतात. लवकरच नळदुर्ग येथील उपजिल्हा रूग्णालय सुरू होणार असून रूग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे नळदुर्गसह परिसरातील रूग्णांना चांगली आरोग्य सीविधा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, किल्ला व इतर सुविधामुळे नळदुर्गचे शहरीकरण झपाट्याने होत आहे परिणामी शहरात विविध गृहप्रकल्प उभे केले जात आहेत. राष्ट्र सेवा दल संचलित 'आपलं घर' बालगृह नळदुर्ग येथील अलियाबाद येथे असल्यामुळे चळवळीचे व पर्यायाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकारी यांचे वास्तव्य या ठिकाणी असते.

सन २०१४ मध्ये भुईकोट किल्‍ला 'राज्‍य संरक्षित स्‍मारक महाराष्‍ट्र' यांच्या 'वैभव संगोपन योजनें'अतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन कंपनीस शासनाने चालवण्यास देवून नळदुर्ग किल्‍ल्‍याचे जतन व दुरुस्‍ती केल्‍याने किल्‍ल्‍याचा चेहरामोहरा बदलला आहे. तसेच नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर पौराणिक पार्श्वभूमी असलेले व महाराष्ट्र शासनाच्या 'क' दर्जाचे पर्यटन क्षेञ आसलेले रामतिर्थ देवस्थान, नैसर्गिक विविधतेने नटलेला परिसर व आकर्षक धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

नळदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी नळदुर्गमध्ये राज्‍यासह देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग हे सर्वोत्तम  सहलीचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. पावसाळ्यामध्‍ये पर्यटकांचे मुख्‍य आकर्षण असलेल्‍या नरमादी धबधबा, सव्वाशे एक्कर क्षेञफळ असलेल्या अंतर्गात भागाचे सुशोभिकरण, पर्यटकांसाठी पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृह व किल्‍ल्‍यातील विविध प्रेक्षणीय स्‍थळापर्यंत पोहोचण्‍यासाठी सुसज्‍जे रस्‍ते, प्रदुषण विरहीत गोल्फ कार, जल विहारासाठी किल्ल्यातील नदीपाञात बोटींग,  आकर्षक कारंजे, फुलझाडे, वृक्षरोपण आदीसह विविध सुशोभिकरणाचे कामे युनिटी मल्टिकाँन्स कंपनीकडून करण्‍यात आली आहेत.

किल्ल्याच्या उत्तरेला राष्ट्रीय महामार्गालगत ( बायपास ) विविध कार्यक्रम मेजवानीसाठी रिसॉर्ट तयार करण्यात आला असून याठिकाणी आधुनिक जिवनशैली व पारंपारिक जिवनशैलीचा उत्क्रष्ट मिलाफ साधल्याचे दिसून येते. भविष्यात वाढत्या पर्यटकामुळे कृषी पर्यटन, रिसॉर्ट, प्रक्रिया उद्योग, हस्तकला, हॉटेल व्यवसाय यातून आणखी रोजगार उपलब्ध होणार आहेत. नळदुर्ग नगरपालिकेने किल्ल्याचा उपयोग करून शाश्वत उत्पन्न व तरुणांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

यामध्ये प्रामुख्याने पार्किंग सुविधा, पर्यटकांना राहण्यासाठी आधुनिक वास्तु, उत्तम दर्जाचे व किफायतशीर  हाँटेल्स, शहरातंर्गत चांगले रस्ते, शाँपिंग काँम्लेक्स उभारणे, शहरात येणाऱ्या पर्यटकासाठी स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थ व उत्पादनांची विक्री करण्यासाठी फेस्टीवल भरवणे, राष्ट्रीय महामार्गालगत रामतीर्थ उच्च पातळी बंधारा येथे सेल्फी पाँईट होत असताना पालिकेने या ठिकाणी चौपाटी विकसित केल्यास तरूणांसाठी रोजगार  उपलब्ध होवू शकतो. यासह मुख्य बाजारपेठेचे रुंदीकरण केल्यास पर्यटकांना होणारा ञास कमी होऊ शकतो.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.