पैठण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या कमी असल्याने मतदार आपल्या पारड्यात पडण्यासाठी मताला १० हजारांचा भाव फुटला असल्याची चर्चा आहे. याला काही मतदारांनी देखील दुजोरा दिला असून आतापर्यंत या बाजार समितीच्या निवडणुकीत कुणी मतदारांना विचारत नव्हते.
मात्र, या निवडणुकीत मात्र आर्थिक कमाई होऊनही मानपान मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भेटायला आलेल्या प्रत्येक उमेदवाराला भाऊ आम्ही तुमचेच कार्यकर्ते असल्याची बतावणी मतदार करीत आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस व शिंदे शिवसेना गटाचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. मतदान ३० एप्रिलला होणार आहे. त्यासाठी चारच दिवस बाकी आहेत. मतदारांना आपल्या कळपात ओढण्यासाठी महाविकास आघाडीतील स्थानिक नेते व शिंदे गटाने विशेष मोहीम खास निवडणुकीसाठी उघडली आहे. या निवडणुकीत मताला १० हजारांचा भाव फुटला असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीचे परिवर्तन सहकार पॅनल व शिंदेगट प्रणीत शिवशाही पॅनेल असे दोन प्रमुख पॅनेल असून या दोन्ही पॅनेलमध्येच खरी लढत होणार आहे. भाजप पक्षही शिंदे गटाचा प्रचार करीत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे.
निवडणुकीतील राजकीय पक्ष बहुमताने संचालक निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. याच संचालकामधून सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली जात असून वरिष्ठ नेत्यांच्यासमोर आपण सभापतीसाठी कसे सक्षम आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकानेच चालविला असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट-भाजप युती!
राज्यातील शिंदे आणि भाजप समीकरणामुळे पैठण तालुक्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. शिंदे गटाचे वर्चस्व हे ठाकरे गटापेक्षा वाढलेले आहे. मात्र, भाजपनेही तालुक्यात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. निवडणुकीत माघार घेतलेल्या भाजपने बाजार समिती निवडणुकीत उडी घेतल्याने शिंदे गट प्रचारात अधिक सक्रिय झाला आहे.
पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी बाजार समितीच्या पाचोड येथे प्रचार शुभारंभप्रसंगी घेतलेल्या मेळाव्यात भाजप तालुकाध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थित राहून शिंदे शिवसेना गटाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे शिवसेना व भाजप युती अशी लढत रंगणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.