Latur Rain Update : घरणी नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

लातूर-उदगीर महामार्गावर नळेगाव (ता.चाकूर) येथील घरणी नदीवरील पर्यायी पूल मंगळवारी (ता.११) सकाळी वाहून गेला.
river news
river newssakal

नळेगाव : लातूर-उदगीर महामार्गावर नळेगाव (ता.चाकूर) येथील घरणी नदीवरील पर्यायी पूल मंगळवारी (ता.११) सकाळी वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे यांनी याठिकाणी पाहणीनंतर विविध सूचना दिल्या.

नळेगाव परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सकाळी या पावसाची नोंद ८३ मिलिमीटर इतकी झाली. पावसामुळे घरणी नदीही दुथडी भरून वाहत होती. लातूर-उदगीर महामार्गावरील घरणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी बनविलेला पर्यायी तात्पुरता पूल मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

पुलांची कामे संथगतीने सुरू

आष्टामोड ते उदगीर या राज्यमार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. ज्या ठिकाणी ओढे आहेत, त्या ठिकाणी जुने पूल पाडून नव्या पुलाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून सिमेंटचे पाइप टाकून पर्यायी पूल तयार करण्यात आले होते. भर पावसाळ्यात पुलाचे काम सुरु आहे. हे पर्यायी पूल धोकादायक आहेत. पूल वाहून गेल्यामुळे हा रस्ता बंद असून उदगीर, चामरगा, बावलगाव, येरोळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.

वाहतूक इतर मार्गावर वळविली

लातूरवरून उदगीरकडे जाण्यासाठी इतर मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणी ओसरण्याची वाट पाहिली जात आहे. त्यानंतर पुलाची डागडुजी केल्यानंतर मार्ग खुला होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी माया येमले, तलाठी पी. जी. माने यांनी येथे भेट दिली. पर्यायी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे चाकूरचे तहसीलदार जाधव यांनी सांगितले.

पर्यायी मार्गाने वळविली वाहतूक

लातूर- उदगीर मार्गावरील नळेगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

लातूर - उदगीरला मार्गावरील वाहतुकीसाठी लातूर-चाकूर-उजळंब-कबनसांगवी -उदगीर रस्ता- मार्गे उदगीर (येरोळमोड जवळ), लातूर-चाकूर -उजळंब- रोहिणा -हेर कुमठा -तोंडारमार्गे उदगीर, लातूर-लातूर रोड -सावरगाव -भाटसांगवी- अंजनसोंडा ते उदगीर. यासोबत शिरूर अनंतपाळमार्गेही लातूर ते उदगीर वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com