Naldurg Yatra 2024 : खंडोबा-बाणाईचे विवाहस्थळ असलेली नळदुर्गची यात्रा

‘खंडेरायाच्या लग्नाला, बाणू नवरी नटली’ हे खंडोबाचे गाणे प्रत्येक कानसेनाच्या ओठावर रेंगाळत असते. आख्यायिकेनुसार, मल्हारी मार्तंड खंडोबाचे आणि बानाईचे लग्न ज्या ठिकाणी लागल्याचे सांगितले जाते, ते ठिकाण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग.
Naldurg Yatra 2024
Naldurg Yatra 2024sakal
Updated on

‘खंडेरायाच्या लग्नाला, बाणू नवरी नटली’ हे खंडोबाचे गाणे प्रत्येक कानसेनाच्या ओठावर रेंगाळत असते. आख्यायिकेनुसार, मल्हारी मार्तंड खंडोबाचे आणि बानाईचे लग्न ज्या ठिकाणी लागल्याचे सांगितले जाते, ते ठिकाण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग. नल राजा आणि राणी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबा इथे प्रकटलेले ठिकाण म्हणजे नळदुर्ग. या ठिकाणी दरवर्षी पौष पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून सुमारे पाच लाखांहून अधिक भक्त येतात. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत खोबरे आणि बेल भंडाऱ्याची उधळण करत भक्तीत रंगून जातात.

- भगवंत सुरवसे, नळदुर्ग

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील श्री खंडेरायाचे इथले पहिले मंदिर. पौराणिक काळातील राजा नल आणि दमयंती यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे. याच नळ राजाने नळदुर्गमध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला. दरवर्षी जानेवारीत पौष पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. त्यावेळी यात्रेसाठी येणारे भाविक आधी नळदुर्ग किल्ल्यातील श्री खंडोबाच्या पहिल्या मंदिरात देवाचे दर्शन घेतात. या पहिल्या मंदिरानंतर नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठावर मंदिर बांधण्यात आले. मात्र, या मंदिरात काही अपवित्र घटना घडल्यानंतर चार किलोमीटर अंतरावर अणदूर इथे खंडोबाचे आणखी एक मंदिर बांधले. छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी ५०० एकर जमीन दान केली. नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सभामंडप बांधल्याचे उल्लेख सापडतात. श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह झालेले हे ठिकाण असून मल्हारी मार्तंड श्री खंडोबाच्या प्रमुख ठिकाणांपैकी नळदुर्ग (मैलारपूर) हे एक आहे. म्हणून या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दोन मंदिरे, एक मूर्ती

नळदुर्ग आणि अणदूरमध्ये दोन मंदिरे असल्याने कालांतराने देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला. त्यातून असा मार्ग काढण्यात आला, की अणदूर येथे सव्वादहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणेदोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा लेखी करार झाला. तो करार आजही पाळला जातो. नळदुर्ग येथील पावणेदोन महिन्यांच्या वास्तव्यावेळी दर रविवारी श्री खंडोबाचा खेटा असतो. यावेळी श्री खंडोबास बाशिंग बांधले जाते व वारू जेवू घातले जातात. तर, पौष पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते.

खंडोबा मूर्तीखाली शिवलिंग

नळदुर्गचे नवे मंदिर बोरी नदीच्या काठावर जुन्या मंदिराच्या ५०० मीटर दूर बांधण्यात आले. अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिरांचे पुजारी एकच असून, ट्रस्टसुद्धा एकच आहे व देवाची मूर्तीसुद्धा एकच. देवाची मूर्ती अणदूरला असते, तेव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग असते. तर, मूर्ती नळदुर्गला असताना अणदूरच्या मंदिरात फक्त शिवलिंग असते. श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग असते. श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदीचा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात. त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो. सकाळी आणि रात्री दोन वेळा सोवळ्यात पूजा केली जाते. रात्री शेजारती म्हटली जाते. दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो. श्री खंडोबाचे अणदूर आणि नळदुर्गमध्ये वेगवेगळे मानकरी आहेत, यात्रा कमिटी वेगळी आहे.

छबिना मिरवणूक, वाघ्या-मुरळीचे नृत्य

पौष पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेवेळी नळदुर्गच्या मानाची काठी नंदीध्वज नळदुर्गचे मुख्य मानकरी असलेल्या मराठा गल्ली येथील खंडेराव नागणे यांच्या घरातून मैलारपूर येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात निघते. आतषबाजी केली जाते. यात्राकाळात नळदुर्ग नगरपालिकेकडून सोयीसुविधा पुरविल्या जातात. राज्य परिवहन मंडळाकडून यात्राकाळात विशेष बस सोडण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य यंत्रणा कार्यरत असते. यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेला छबिना मिरवणूक, वारू जेवू घालणे, तळी उचलणे, वाघ्‍या मुरळीचे नृत्य, पट बांधणे, श्रीला नैवेद्य दाख‍वणे, काठ्या नाचविणे यांसह मंदिरावर बेल, भंडारा व खोबऱ्याची मुक्‍त उधळण करत ‘येळकोट येळकोट घे’चा जयघोष होतो. यामध्ये यात्राकाळात महाराष्ट्र कर्नाटक व इतर ठिकाणांहून हजारो नंदीध्वज दाखल होतात. मंदिर परिसरात यात्राकाळात प्रसादाच्या दुकानांसह जीवनावश्यक वस्तू, खेळणी, हॉटेल मनोरंजनाची साधने असलेल्या मौत का कुंआ, आकाश पाळणे यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागतो.

यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा

पूर्वी भक्तगण श्री खंडोबा यात्रेसाठी बैलगाडी घेऊन येत. किमान तीन ते पाच दिवस मंदिर परिसरात मुक्काम करत. मात्र, आजघडीला बदलती जीवनशैली, यात्राकाळात असणारी थंडी, कामाचा व्याप व प्रवासाच्या आधुनिक साधनांमुळे ऐन यात्रेच्या दिवशीच भाविक येतात व दर्शन घेतात. यामुळे आठ दिवस भरणारी यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवला जातो. महाराष्ट्र केसरी, उपकेसरी बहुमान मिळवलेले पहिलवानही यावेळी हजेरी लावतात.

दोन्ही मानकऱ्यांमध्ये होतो लेखी करार

नळदुर्ग हे शहर सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर आहे. तुळजापूर शहर येथून तीस किलोमीटर, तर तीर्थक्षेत्र अक्कलकोट चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व नळदुर्ग (मैलारपूर) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार किलोमीटर आहे. मंदिरे दोन आणि मूर्ती एक अशी शेकडो वर्षांपासून परंपरा सुरू आहे. तसेच, अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला देवाची मूर्ती नेताना-आणताना दोन्ही गावांतील मानकऱ्यांमध्ये लेखी करार केला जातो.

नगर परिषदेमार्फत मंदिर परिसरात विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि मंदिर परिसर विकासामुळे शहरातील व्यवसाय वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

- लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी, नळदुर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.