नांदेडची अभिनव चित्रशाळा आहे लय भारी, कशी? ते वाचाच

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : त्र्यंबक सांबाराव वसेकर हे मराठवाड्यातील चित्रकला शिक्षणाचे जनक, ध्येयासक्त कला प्रचारक आणि कुशल चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. एक जुलै १९५५ रोजी मराठवाड्यातील ‘अभिनव चित्रशाळा’ या पहिल्या कला महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. आजही या शाळेतून हजारो विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत. 

पुण्या-मुंबईपासून दूर असल्यामुळे मराठवाड्याच्या कला क्षेत्राला महाराष्ट्राला फारशी ओळख नाही. पण त्यामुळे तेथल्या कलावंतांचे महत्त्व कमी मानता येणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नांदेड शहरात कलाक्षेत्राला एकदम सुगीचे दिवस आले. पंडित अण्णासाहेब गुंजकरांनी या भागात संगिताचा प्रसार केला. इतिहासाचार्य वि. अ. कानोले यांनी इतिहास संशोधन मंडळाचा पाया घालून प्राचीन संस्कृतिचा शोध घेतला. दे. ल. महाजन यांनी साहित्य चळवळीचा पाया रोवला. तर त्र्यंबक वसेकर यांनी मराठवाड्याला चित्रकला शिकविली. 

त्र्यंबक वसेकर यांना चित्रकलेचा वारसा आजोबांकडून मिळाला. हा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी शिक्षकाची नोकरी सोडून या कलेला शास्त्रीय शिक्षणाची जोड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी हैदराबाद येथील आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथून जी.डी.ची पदवी मिळवली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अंबाजोगाई येथील जोगेश्वरी महाविद्यालयात चित्रकलेची नोकरी स्वीकारली. ही नोकरी करतानाच मद्रास हायर डिप्लोमा हा चित्रकलेचा उच्च अभ्यासक्रम पूर्ण केला.

परंतु, मुलांना निव्वळ चित्रकला शिकवून मराठवाड्यातील समाजात चित्रकलेला मानाचे स्थान प्राप्त होणार नाही. त्यामुळे त्यांनी नांदेड येथे १९५५ मध्ये अभिनव चित्रशाळेची स्थापना केली. बघताबघता या चित्रशाळेने चित्रकला विद्यापीठाचे स्वरूप धारण केले. या चित्रशाळेतून चित्रकलेचे शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज मराठवाडा, महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही शिकवत आहेत. चित्रकलेच्या शिक्षणाला प्रमाणित करण्यासाठी अभिनव चित्रशाळेने पहिलीपासून दहावीपर्यंतच्या मुलांसाठी चित्रकलेच्या वेगवेगळ्या पातळीवरील परिक्षा घेतल्या. आजही या शाळेच्या परीक्षांना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखावर विद्यार्थी बसतात.  

पाया झाला मजबूत
त्र्यंबक आणि सुभाष वसेकर यांनी एका छोट्याशा खोलीत, केवळ चार विद्यार्थ्यांसह ‘रेखाकला व रंगकला' अभ्यासक्रम सुरु केला. तसेच बालकांच्या सर्जनशीलतेला संधी देण्यासाठी ‘बाल चित्रकला वर्ग' सुरु केला. कालांतराने ‘चित्रकला शिक्षण प्रशिक्षण' हा अभ्यासक्रमदेखील सुरु करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील शेकडो शाळांना कलाशिक्षक उपलब्ध झाले आणि शालेय कलाशिक्षणाचा पाया मजबूत झाला. बालचित्रकलेच्या प्रसारासाठी दोघांनीही आरंभ, बोध, आनंद, विशारद या नावांच्या बालचित्रकला सुरु केल्या. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मुलांच्या मुक्त आविष्काराला आणि नवनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. या परीक्षा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यांतही लोकप्रिय झाल्या.  

प्रतिकुल परिस्थितीत जपला वारसा
त्र्यंबक वसेकर यांचे १२ जुलै २००६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सुभाष वसेकर हा वारसा जोपासत आहे. परंतु, प्रकृती साथ देत नसल्याने हा वारसा जोपासण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. असे असले तरी, त्यांचे शिष्यगण ही कार्यशाळा चालवित आहे. सुभाष वसेकर यांचे पऱ्यांची शाळा, परीचे अश्रू, समुद्रातील राज्यात राजू आदी बालकविता कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यापैकी पऱ्यांची शाळाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२००४) मिळालेला आहे. आंबेजोगाई येथे १९९७ मध्ये भरलेल्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते.

कलाशिक्षणाचे आद्यप्रवर्तक
शासनाकडून फारसे सहकार्य मिळत नाही तरीही मानसिक गुंतवणुकीमुळे संस्था आजही तेवढ्याच जोमाने काम करत आहे. मराठवाड्यातील कलाशिक्षणाचे आद्यप्रवर्तक म्हणून त्र्यंबक वसेकर यांचे नाव आजही घेतले जाते.   
- सुभाष वसेकर (प्राचार्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.