नांदेड : कंधार तालुक्यातील पेठवडजच्या जिल्हा परीषद शाळेतील रिक्त असलेली शिक्षक व सेवकांची पदे भरावीत, यासाठी ग्रांमपंचायत सदस्य नारायण गायकवाड यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी पाठपुरावा करत आहे. रिक्तपदे न भरल्यास आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी प्रशासनाला दिला होता. जिल्हा परिषद विभागाने त्यांच्या इशाऱ्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या कार्यालयात नारायण गायकवाड ठिय्या आंदोलन करून शाळेला ‘शिक्षक-सेवक दाता की, आत्मदहन करु’ असे म्हणत चांगलेच धारेवर धरले.
एक जानेवारीला दिले होते निवेदन
पेठवडज येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत ७९८ विद्यार्थी आहेत. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचारी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. येथील रिक्त पदे तात्काळ भरावी यासाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्राम पंचायत सदस्य नारायण गायकवाड यांनी एक जानेवारी रोजी निवेदन दिले होते. निवेदनात त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर जिल्हा परीषद प्रशासनाने निवेदनावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे नारायण गायकवाड यांनी शुक्रवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या दालनात जाऊन निवेदनाबाबत जाब विचारून घोषणाबाजी करत त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
हे वाचा - नांदेडात वाळू माफियांचा पुन्हा हल्ला
लेखी पत्रदिल्याने आंदोलन मागे
जिल्हा परीषदेच्या परिसरात नारायण गायकवाड यांच्या आंदोलनाची चर्चा रंगली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गायकवाड यांची बराचवेळ समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र निवेदनावर कारवाई होणार नाही; तोपर्यंत दालनातुन बाहेर जाणार नसल्याचा पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. यापुढे जाऊन त्यांनी पुढे कारवाई झाली नाही तर, दालनातच आत्मदहन करण्याचीही धमकी दिली. त्यांच्या या पवित्र्यामुळे जिल्हा परीषद प्रशासनाची चांगलीच भंभेरी उडाली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन आठवड्यात या प्रकरणावर कारवाई केली जाईल, रिक्त पदे भरले जातील असे लेखी पत्र दिल्यानंतर नारायण गायकवाड यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
हेही वाचलेच पाहिजे - श्रद्धेवर अंधश्रद्धा वरचढ : कशी ते वाचा
अशी तापली जिल्हा परिषद
इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यापासून गाव खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा नावालाच उरल्या आहेत. सामान्य कुटुंबातील मुले शिकत असलेल्या या शाळांकडे खुद्द शिक्षण विभागाचे देखील फारसे लक्ष नसल्याचे गाव-खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यानंतर दिसून येते. त्यामुळे या शाळांमध्ये कधी शिक्षकांची तर, कधी वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांची कमी दिसून येते. मात्र ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असताना देखिल कंधार तालुक्यातील पेठवडज गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला शिक्षक आणि सेवक मिळत नसल्यामुळे गावातील ग्रामपंचायतच्या एका सदस्याने चक्क ‘शिक्षक देता की आत्मदहन करु’ असा इशारा देत जिल्हा परिषद तापवून दिली.
|