हिंगोली- ओबीसी बांधवांचा महाएल्गार मेळावा आज हिंगोलीमध्ये पार पडला. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सभेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सभेवेळी मोठ्या प्रमामात ओबीसी बांधव जमले होते.
मी काही बोललो की मी दोन समाजात तेढ निर्माण करतो म्हणतात. पण, त्यांच्या १५ सभा झाल्या. आमची एखादी सभा होते. पण, ते मला काहीही बोलत आहेत. फोन करुन मला शिव्या दिल्या जात आहेत. गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत. मला आणि कुटुंबाला दोन महिन्यांपासून शिव्या दिल्या जात आहेत. आम्ही कसं जगायचं, असा सवाल त्यांनी केला.
ते दगड मारताहेत. त्यांनी घरंदारं पेटवली. मी कुठं घरं पेटवतोय. पेटवायला अक्कल लागत नाही. जोडायला, घडवायला अक्कल लागते. ज्यांचा जमीर जिंदा आहे ते आपोआप समर्थन देतात. अगर आप जिंदा हो तो जिंदा आणा भी जरुरी है, असं ते म्हणाले.
भुजबळ म्हातारा झाला म्हणतात. होय मी म्हातारा झालो. तुम्हीपण एक दिवशी म्हातारे व्हाल. जेवढे माझे केस पिकलेत तितके आंदोलनं भुजबळाने केली आहेत. एका आंदोलनाने केसं पिकली नाहीत, असं म्हणत त्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.
आमचं आरक्षण चुकीचं आहे म्हणून कोर्टात गेले आहेत. आम्हाला बाहेर काढून त्यांना आतमध्ये यायचं आहे. ओबीसींचे आरक्षण मराठ्यांना देण्याचा डाव आहे. मी बीडमध्ये गेलो . त्याच्यावर टीका झाली. विचारपूस करायला देखील जायचं नाही का? हम आहं भरते है तो बदनाम होते है, वो कत्ल करता है चर्चा भी नही होती. त्याने काहीही केलं तरी बोललं जात नाही, असं भुजबळ म्हणाले.
पहिलं आरक्षण वसंतराव नाईक यांनी दिलं, दुसरं आरक्षण शरद पवारांनी मंडळ आयोगाची अंमलबजावणी करुन 27 टक्के दिलं. शरद पवारांना कोणाचं आरक्षण कमी करायचं किंवा नवीन टाकायचे अधिकार नव्हते. तरी त्यांनी ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली. त्याबद्दल त्यांचे आभार, असं भुजबळ म्हणाले.
प्रशासकीय सेवांमध्ये पाहिलं तर सर्वाधिक संख्या मराठा समाजाची आहे. मराठा समाजात गरीब आहेत त्यांना नक्कीच मदत मिळावी. मोदींनी दिलेल्या १० टक्के ईबीसी आरक्षणाचा 85 टक्के मराठ्यांना लाभ मिळत आहे. जे सारथी संस्थेला दिलं आहे ते ओबीसी समाजाला पण द्या, अशी मागणी भुजबळांनी केली.
लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली असं म्हणता. आमची लायकी काढता, असं म्हणत भुजबळांनी अनेक नेत्यांच्या नावाचा दाखला दिला. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी हुडकून काढली. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्यांची लायकी नाही असं तुम्ही म्हणता, अशी घणाघाती टीका भुजबळांनी जरांगेंवर केली.
एखादा मागास जमातीतील एसपी असेल त्याने मराठा समाजातील सब इन्स्पेक्टरला सल्युट करायचा का? आमची लायकी काढता. गावबंदी करण्यात आली आहे. काही मराठा नेत्यांचे गावात स्वागत केले जात आहे. पण, इतरांना गावबंदी करण्यात येत आहे. गावबंदी करणाऱ्यांना महिन्याभराच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. पण, कोणाला शिक्षा झाली. सगळेजण गप्प का आहेत? असा सवाल भुजबळांनी केला.
दरम्यान, छगन भुजबळ हे सभेला जाण्याआधी तीनवेळा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली असल्याने दोन्ही गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.