NEET Exam : मुख्याध्यापकास पोलिस कोठडी; लातूरचे धागेदारे दिल्लीपर्यंत

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत सहभागी असल्याच्या संशयावरून येथे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
police custody
police custodysakal

लातूर - ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत सहभागी असल्याच्या संशयावरून येथे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या सार्वजनिक परीक्षा (गैरव्यवहार प्रतिबंधक) कायदा २०२४ अंतर्गत राज्यातील हा पहिला गुन्हा आहे.

चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या जलिल उमरखाँ पठाण (वय ३४, रा. अलहायात अपार्टमेंट, लातूर) यास अटक करून पोलिसांनी सोमवारी (ता. २४) न्यायालयात हजर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. चव्हाण यांनी पठाण यास आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

‘नीट’ परीक्षेत गैरकृत्य केल्याप्रकरणी संजय तुकाराम जाधव (वय ४०, रा. जिजाऊ कॉलनी, रेणापूर रस्ता, लातूर), जलिल उमरखाँ पठाण (वय ३४, रा. टाके नगर, लातूर), इरन्ना मष्णाजी कोनगलवार (रा. उमरगा, जि. धाराशिव), गंगाधर (रा. दिल्ली) यांच्याविरोधात येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २३) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पठाण आणि जाधव यांना नांदेडच्या ‘एटीएस’ पथकाने शनिवारी (ता. २२) रात्री उशिरा ताब्यात घेतले होते.

प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. चौकशीसाठी आम्ही पुन्हा बोलवू. लातूर सोडून जाऊ नका, अशा सूचना पोलिसांनी दोघांनाही दिल्या होत्या. मात्र, जाधव फरारी झाला. तर पठाण याला पोलिसांनी आज पुन्हा ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यामुळे लातूरातील ‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोचले असल्याचे निष्पन्न झाले. ‘एसटीएस’ पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेज काजी यांनी या प्रकरणी काल रात्री साडेअकराच्या सुमार फिर्याद दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला.

जाधवचा शोध सुरू

जाधव हा लातूर सोडून पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. उमरगा आणि दिल्ली येथील संशयित आरोपींचाही शोध घेतला जात आहे. पठाण हे लातूर तालुक्यातील कातपूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तर जाधव हे टाकळी (ता. माढा. जि. सोलापूर) जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पठाण आणि जाधव हे मित्र असून चारही आरोपी जानेवारीपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीत ते सहभागी असून त्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार घडून आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आणखी चार संशयितांची ‘एटीएस’ पथकाने लातूरमध्ये चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

काय आहे नवा कायदा?

परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक परीक्षा (गैरव्यवहार प्रतिबंधक) कायदा २०२४ लागू करण्यात आला आहे. यानुसार आरोपीला तीन ते दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. परीक्षेमध्ये हेराफेरी करणे, त्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी होणे, गैरकृत्यात सहभाग असणे अशांविरोधात हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. फेब्रुवारीमध्ये संमत झालेल्या कायद्याची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.

विद्यार्थी, पालकांकडून वसुली

लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी ‘नीट’ परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी, पालकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींचा देशाच्या विविध भागांत घडणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणात सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी आणि लातुरातील आरोपींच्या संपर्कात असलेला दिल्लीतील आरोपी गंगाधर याला ताब्यात घेण्यासाठी लातूर पोलिसांचे पथक लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे. यामुळे गैरव्यवहारात सहभागी संस्थांची माहितीही मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com