‘झेडपी’च्या अध्यक्षपदी निर्मलाबाई विटेकर, उपाध्यक्षपदी अजय चौधरी

अध्यक्षपदी निर्मलाबाई विटेकर, उपाध्यक्षपदी अजय चौधरी
अध्यक्षपदी निर्मलाबाई विटेकर, उपाध्यक्षपदी अजय चौधरी
Updated on

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाबाई उत्तमराव विटेकर यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अजय अशोकराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीसोबत भाजपसह सर्वच पक्षांच्या सदस्यांनी या निवडीला पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही. त्यामुळे ‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी’ या म्हणीचा प्रत्यय या निमित्ताने आला आहे.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी होणार हे निश्चित होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुढाकार करत शिवसेना, काँग्रेस, भाजप, रासप आणि अपक्षांना एकत्र करत राज्यात वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. मंगळवारी (ता. सात) सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी अर्ज स्वीकारले. या वेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती निर्मलाबाई उत्तमराव विटेकर आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय अशोकराव चौधरी यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर दुपारी तीन वाजता ५४ पैकी ५३ सदस्यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली.

या वेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अध्यक्षपदासाठी सूचक म्हणून भरत घनदाट, तर उपाध्यक्षपदासाठी रामराव उबाळे यांनी स्वाक्षरी केली. निवडीनंतर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. जिल्हा परिषदेचा परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, भाजपचे गणेश रोकडे आदींच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २४, शिवसेना १३, काँग्रेस सहा, भाजप पाच, रासप तीन, घनदाट मित्रमंडळ एक, अपक्ष दोन असे संख्याबळ आहे. बहुमतांसाठी २८ सदस्यांची गरज होती. मागील कार्यकाळात राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. या वेळेस महाविकास आघाडीची चर्चा सुरू झाली. परंतु, या आघाडीत त्यांच्यासोबत भाजपसह सर्वच पक्ष, अपक्ष सहभागी झाल्याने राज्यात अनोखी अशी महाआघाडी झाली आहे.

 विरोधक नसलेली जिल्हा परिषद
सध्या जिल्हा परिषदेत सर्वच पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली आहे. ५४ सदस्य एकत्र आल्याने पहिल्यांदाच विरोधी पक्ष नसलेली जिल्हा परिषद ठरली आहे. राज्यात परभणीसारखे राजकारण कुठेच नसणार आहे. एकीकडे सर्वत्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र असताना परभणीत मात्र, सारेच एकत्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


बाबाजानी ठरले शिल्पकार
जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीचे शिल्पकार आमदार बाबाजानी दुर्राणी हे ठरले आहेत. नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना एकाच मांडवाखाली आणणे काही सोपे नव्हते. परंतु, बाबाजानी यांनी ते करून दाखविले आहे. सुरवातीला राष्ट्रवादीसोबत शिवसेना, काँग्रेस हे पक्ष येणार अशी चर्चा होती. मात्र, बाबाजानी यांनी काय अशी जादू केली, की जिल्हा परिषदेतील सर्वच पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आले.  सर्वप्रथमच ५४ सदस्यांनी एकत्रित गुलाल उधळला.

    अखेर जिंतूरकरांनी खेचले उपाध्यक्षपद
अध्यक्षपद सोडण्याच्या बदल्यात उपाध्यक्षपदाची मागणी लावून धरणाऱ्या माजी आमदार विजय भांबळे यांना उपाध्यक्षपद आपल्या मतदारसंघात खेचण्यात यश आले आहे. सुरवातीला शिवसेनेकडे हे पद जाणार अशी चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी भांबळे यांनी बाजी मारली आहे. आपले कट्टर समर्थक अजय चौधरी यांच्यासाठी त्यांनी दोन दिवसांपासून मागणी लावून धरली होती.

      १७ तारखेला सभापतिपदांच्या निवडी
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर सभापतिपदांच्या निवडी येत्या १७ तारखेला होणार आहेत. सत्ते सहभागी असलेल्या काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एक सभापतिपद मिळणार आहे. काँग्रेसकडून श्रीनिवास जोगदंड, तर शिवसेनेकडून अंजली अनेराव यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या वाटेला येणाऱ्या सभापतिपदांची नावे अद्याप चर्चेत आली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.