परभणी : मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका मराठवाड्यातील आंबा फळझाडांना बसला आहे. सध्या जरी स्वच्छ सूर्यप्रकाश पडत असला तरी, मागील काही दिवसांपासून आंबा मोहर गळण्याचे प्रमाण वाढले. अनेक ठिकाणी अजूनही आंब्याला मोहर लागला नसल्याने यंदा स्थानिक आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी संवाद साधून माहिती घेतली आहे.
मराठवाड्यात यंदा जानेवारी महिन्यांपासून ढगाळ वातावरण राहिले आहे. त्याचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे थंडीचा प्रभाव कमी होऊन गव्हाची वाढ खुंटली आहे. तसेच हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता. रब्बी पिकांसह फळबागांवरदेखील परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात येणारे आणि फळांचा राजा असणारे फळ म्हणजे आंबा होय. दरवर्षी जानेवारी महिन्यात आंब्यास मोहर लागतो. पुढे मोहोराचे रुपांतर फळात होते. मात्र, आंबा परिपक्व होईपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
जरी ढगाळ वातावरण निर्माण झाले की, मोहोर गळू लागतो. तसेच लहान फळेदेखील पडू लागतात. त्यामुळे आंबा फळांचे भवितव्य निसर्गावर अवलंबून आहे. सर्वत्र आंबा पिकावर ढगाळ वातावरणाचे संकट आल्याने बहुतांष ठिकाणी अद्यापही मोहर लागलेला नाही. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहिल्याने आणि थंडीचे प्रमाण कमी असल्याने मोहोर फुटण्यास एक महिना उशिरा झाल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिली.
मोहरच लागला नाही
नुकताच लागलेला मोहोर गळून जात आहे. तर, काही ठिकाणी मोहरच लागला नसल्याचे समोर आले आहे. आंबा बागायतीचे प्रमाण मराठवाड्यात कमी असले तरी दोन झाडाहून अधिक आंब्याची झाडे असणारी असंख्य शेतकरी आहेत. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात आंबा बागायतदारांची संख्या वाढली आहे. अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आंबा बागायतदार आहेत.
सर्वच भागात तीन ते चार पिढ्यांपासून जपलेली आंब्याची वृक्षदेखील आहेत. सावलीसोबत रसाळ फळे देणाऱ्या या वृक्षावर यंदा मोहर लागला नसल्याने अनेकांचा हिरमोड झालेला आहे. काही वृक्षांना मोहर लागला असला तरी तो गळू लागल्याने शेवटपर्यंत किती राहतो, ते सांगणे अवघड आहे.
हेही वाचा - चार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामास मंजुरी
या बाबीकडे लक्ष द्यावे
आंबा फळबागेत मोहोर फुटला असल्यास हानिकारक कीटकनाशकाची फवारणी करू नये, जेणेकरून परागीभवनास अडथळा निर्माण होईल. आंबा फळबागेत खोडकीडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
मुख्य खोडालगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिद्रामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरपायरीफॉस द्रावणाचा (२ मिली प्रति लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे, अशा उपाययोजना कृषी विद्यापीठाने सुचविल्या आहेत.
अजूनही मोहोर लागू शकतो
पावसाळा लांबल्याने आणि थंडी कमी पडल्याने आंबा मोहोर लागण्यास एक महिन्याचा अधिकचा वेळ लागला आहे. दरवर्षी कोकणापेक्षा मराठवाड्यात एक महिन्याने उशिरा मोहोर लागतो. यंदा फेब्रुवारी महिन्यात मोहोर लागण्यास प्रारंभ झाला आहे. अजूनही मोहोर लागू शकतो. तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने आंबा फळपिकास पाणी द्यावे.
- डॉ. एम. बी. पाटील, शास्त्रज्ञ, फळसंसोधन केंद्र हिमायतबाग, औरंगाबाद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.