नांदेड : अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. परिणामी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आहे. परंतु, पोखरभोसी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना दिली जात आहे. त्यामुळे परिसरामध्ये बहुतांश शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली जात आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये देशी गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही बहुतांश ठिकाणी देशी गायींचे पालन करणारे शेतकरी, काही कुटुंबे बघायला मिळतात. मात्र हे प्रमाण तसे कमीच आहे. देशी गायी जगल्या पाहिजेत, त्यांचे संगोपन, संवर्धन व्हावे या हेतूने कृषी गोविज्ञान बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी येथे चालविली जात आहे. सव्वा एकर जागेत असलेल्या या गोशाळेत एकूण दोनशे देशी गायी आणि कालवडी आहेत. यात काही कसायांकडून सोडवून आणलेल्या, काहींनी दान दिलेल्या गायी आहेत.
कृषी गोविज्ञान बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे चार ऑगस्ट २०१० ला कारेगाव येथे श्रीकृष्ण गोशाळेची स्थापना केली. सुरुवातीला ३५ गायी होत्या. कालांतराने म्हणजे २९ फेब्रुवारी २०१२ ही गोशाळा पोखरभोसी येथे गोविंद नारायण डांगे यांनी दान दिलेल्या जागेत स्थलांतरित झाली. तेथे सध्या दोनशे गायी आहेत. मधुराबाई गोविंदराव डांगे या समर्पित भावनेने ही गोशाळा चालवत असून, सेंद्रिय शेतीही करतात. कडब्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना शेणखत आणि गोमूत्र दिले जाते.
मानवी मूल्यांचे होतेय जतन
गोशाळेचे मार्गदर्शक डॉ. बाळासाहेब साजणे यांच्या पुढाकारातून डॉक्टर, जैन, गुजराती, माहेश्वरी समाजबांधवांच्या दातृत्वावर ही गोशाळा चालविली जात आहे. निसर्गाला पूरक जे जे लागते ते देशी गाय देते. भारतीय शेतीचा कणा म्हणजेच गो-धन. याचे पालन केले असता पर्यावरण, शेतीचे रक्षण, संस्कृतीचे जतन, आरोग्य संवर्धन आणि विशेष म्हणजे सद्भावना या मानवी मूल्यांचे जतन होते.
गोशाळेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शेणखत, गोमूत्रापासून सेंद्रिय शेती फुलवली आहे. सध्या ढोबळी मिरची, वांगी, हळद, ऊस आणि कापसाचे सेंद्रिय पद्धतीने पीक घेत आहे. परिसरातील बहुतांश शेतकरीही सेंद्रिय शेती करत आहेत.
- गोविंद नारायण डांगे, पोखरभोसी.
पर्यावरणाचे रक्षण व गोशाळा स्वावलंबी व्हावी म्हणून गायीच्या शेणाची पावडर आणि मुलतानी मातीचा उपयोग करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवितो. गत दोन वर्षांपासून सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
- प्रल्हाद घोरबांड, काळजीवाहक, श्रीकृष्ण गोशाळा, पोखरभोसी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.