चला जाऊ शेतकऱ्यांच्या गावा; शेतबांधावर मिळणार मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर
कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर
Updated on

उस्मानाबाद : खरीप पिके, शेतीविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ‘चला जाऊ शेतकऱ्यांच्या गावा’ हा ऑनलाइन मार्गदर्शनाचा उपक्रम बुधवारपासून (ता. १३) सुरू करण्यात आला आहे.

लॉकडाउन परिस्थितीत खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके, शेतीविषयक विषयांवर मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उस्मानाबाद) वतीने १३ ते १९ मेदरम्यान शेतीविषयक विविध विषयांवर ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्याचे नियोजित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतबांधावर किंवा घरी राहून खरीप हंगामातील पीकलागवडीसह अन्य विविध विषयांवर झूम अॅपच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

बुधवारपासून सुरू झालेल्या या उपक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. अपेक्षा कसबे यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावर शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील पिकांची लागवड करताना कोणते बियाणे वापरावेत, खताचे नियोजन कसे करावे, लागवडीची पद्धत, याविषयी शास्त्रशुद्ध माहिती प्रा. कसबे यांनी शेतकऱ्यांना दिली. बियाणाची उगवण क्षमता कशाप्रकारे तपासली पाहिजे, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. या ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये ९७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

या उपक्रमाअंतर्गत १४ मे रोजी हुमणी अळी व्यवस्थापन, १५ मे रोजी उन्हाळी हंगामात फळबागांचे व्यवस्थापन आणि निरोगी स्वास्थ्याकरिता पोषणमूल्य आधारित शेती पद्धती व पोषण बागेची गरज, १६ मे रोजी मृदापरीक्षण आधारित खरीप पिकांकरिता खत व्यवस्थापन, मेघदूत अॅप : शेतकऱ्यांसाठी वरदान, १९ मे रोजी दुग्ध व्यवसाय : उद्योजकता विकास संधी आणि रुंद वरंबा व सरी (बीबीएफ) टोकन यंत्राची जोडणी व वापर अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांकरिता ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन, तूर व कडधान्य वर्गातील पिके शेतकरी घेतात. त्यासंदर्भात सविस्तर माहिती प्रत्येक पिकानुसार कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून दिली जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला असून, निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
- प्रा. सचिन सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर 
कृषी विज्ञान केंद्राने ऑनलाइन पद्धतीने नियोजित केलेले प्रशिक्षण निश्चितच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांना कोठेही न जाता बांधावर किंवा घरी राहून त्यांना हे मार्गदर्शन मिळणार आहे. 
- गोरक्षनाथ भांगे, जिल्हा कृती संगम समन्वयक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.