वाशी (जि. उस्मानाबाद) : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहिरीचा कठडा ढासळल्याने दगड अंगावर पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना तालुक्यातील बनगरवाडी येथे रविवारी (ता. तीन) सकाळी आठच्या सुमारास घडली. विहिरीत पोहणारी अन्य पाच ते सहा मुले बालंबाल बचावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की बनगरवाडी येथील काही मुले रविवारी सकाळी गावालगच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. या वेळी करण पिंटु बोडके (वय १२), विवेक आश्रुबा लांडगे (वय १२, दोघेही रा. बनगरवाडी) हे पोहणे झाल्यानंतर विहिरीच्या कठाड्यावर बसून विहिरीत पोहत असलेल्या अन्य पाच ते सहा युवकांकडे पाहत आनंद घेत होते.
मात्र दुर्दैवाने याचवेळी या दोघांवर काळाने घाला घातला. ते बसलेल्या कठडा अचानक ढासळला. ढासळलेल्या या कठड्याबरोबरच हे दोघेही विहिरीत पडले. कठड्याच्या दगडाखाली पाण्यात बुडून करण व विवेक या दोघांचा मृत्यू झाला. विहिरीत पोहत असलेले अन्य पाच ते सहा जण सुदैवाने बचावले. मुलांच्या ओरडण्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी या विहिरीकडे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीतील पाणी वीजपंपाच्या सहाय्याने काढुन ढासळलेल्या कठड्याखाली अडकलेल्या या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच बनगरवाडी गावातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. या वेळी दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.