यंदा विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार पाठ्यपुस्तके

उस्मानाबाद : गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके.
उस्मानाबाद : गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके.
Updated on

उस्मानाबाद : शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होईल, हे निश्चित नसले तरी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र यंदा विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, खासगी अनुदानित व नगरपालिका शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच त्यासाठीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून केले जाते. विद्यार्थ्यांची संख्या, वर्गनिहाय असलेल्या पुस्तकांची संख्या, एकूण पुस्तके यांची मागणी नोंदवली जाते. त्यानंतर ही पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त होतात. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ही पुस्तके जिल्हास्तरावरून पोच केली जातात.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून केंद्रप्रमुख आणि त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांकडे पाठ्यपुस्तके पोच केली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. यासाठी पाठ्यपुस्तक वितरणाचे कार्यक्रमही त्या-त्या शाळांमध्ये घेतले जातात.

यंदा मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षी साधारणतः १५ जूनच्या आसपास शैक्षणिक वर्षाला सुरवात होते. परंतु लॉकडाउनमुळे यंदा शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार हे अद्यापही निश्चित नाही. शैक्षणिक वर्ष केव्हाही सुरू झाले तरी त्यासाठीचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाठ्यपुस्तके मागविण्यात आली आहेत.

उस्मानाबाद तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयानेही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडे नोंदवली होती. तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन लाख ३९ हजार १३७ पुस्तकांची गरज आहे. आतापर्यंत एक लाख २१ हजार १७६ पुस्तके तालुक्याला प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तके येत्या काही दिवसांत प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोफत पाठ्यपुस्तके संबंधित विद्यार्थ्यांना घरपोच देण्याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण पुस्तके प्राप्त झाल्यानंतर ती केंद्रप्रमुखांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. त्यानंतर केंद्रातून ही पुस्तके संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. यासाठी कार्यालयीन विस्तार अधिकारी दैवशाला हाके, अरुणा कांबळे यांच्या संनियंत्रणाखाली विनोद जानराव, नितीन डोके, प्रवीण सरवदे, विकास दिवटे, विस्तार अधिकारी राजाभाऊ गिरी यांनी पुढाकार घेतला आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक लाख २१ हजार १७६ पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तके येत्या दोन ते तीन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. यंदा मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना घरपोच देण्याचे नियोजन आहे. 
- प्रकाश पारवे, गटशिक्षणाधिकारी, उस्मानाबाद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.