पराभवाने झालेली वेदना असते यशासाठी प्रेरकच, कशी ते वाचाच

File photo
File photo
Updated on

नांदेड : विजय आणि पराजय जीवनातील अविभाज्य घटक आहेत. कधी यश कधी अपयश येत राहणारच. विजयाने उतावीळ होऊ नये आणि पराभावाने खचून जाऊ नये. जी माणसं अपयशाने कोसळत नाहीत तिच माणसं पुन्हा विजय संपादन करण्याच्या लायकीचे असतात. लायकी नसताना मिळालेला विजय सुध्दा शोभून दिसत नाही. लायकी असताना एखाद्या वेळी झालेल्या पराभवाने काही फरक पडत नाही. पराभव देखील खूप काही शिकवून जातो. पराभवाने झालेली वेदनाच भावी यशासाठी प्रेरक ठरते.

विजयासाठी शिक्षण, प्रशिक्षण अन् सततचा सराव, अभ्यास जितका महत्त्वाचा असतो तितकेच महत्त्वाचे असते आपली मानसिकता, सभोवतालचे वातावरणही महत्त्वाचे असते.  प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची, पराजयाला विजयात रूपांतर करण्यासाठी पुन्हा पुन्हा सिद्ध होण्याची तयारी असलेल्या माणसाला कोणीही यशापासून कायम दूर ठेवू शकत नाही. अब्राहम लिंकन यांचा जनतेने पराभव केला होता. पण लिंकन अपयशाने खचून न जाता यशस्वी होण्याचा चंग बांधला होता. शेवटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेच.

तरच मानसिकता सकारात्मक राहते
कधी पराभव झाला तर प्रतिस्पर्धी माणसांच्या गुणांचे कौतुक करण्याची तयारी ठेवावी; पण त्यासाठी उतावीळ होऊ नये. सोबतच्या माणसांच्या मानसिकेता विचार केला पाहिजे. पराभव केलेल्या व्यक्ती आणि संघाचे तत्काळ सत्कार सोहळे आयोजित करण्याची घाई करू नये, यामुळे सहकार्य करण्याचे मनोधैर्य आणखी खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी व्यक्तीने, संघांनी जास्त मेहनत घेतली होती. संघभावना अधिक मजबूत होती. काही खेळाडू गुणी  होते, हे मान्य करून ते गुण, ती मेहनत आपल्यामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. हा बोध घेऊन वाटचाल केल्यास नक्कीच पराभवाचे काही वाटत नाही. उलट आपली मानसिकता सकारात्मक राहते. तयारी चांगली होते.  

कृती आणि उक्ती हाच उपकारक मार्ग
काहीजण पराभव सहनच करू शकत नाहीत. अशी माणसं नैराश्याचे शिकार होतात. ही बाब आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली नाही, असा त्याचा अर्थ होतो. आत्मपरीक्षण, आत्मसुधारणा, सकारात्मक मानसिकता, कष्टाळू आणि अभ्यासूवृत्ती विकसित करत वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळण्यास, व्यक्तिमत्व समृद्ध होण्यास मदत होते. खिलाडूवृत्ती अंगी भिनलेले माणसं पराभव मनावर घेत नाहीत, पण नक्कीच काहीतरी उपकारक असा बोध घेऊन वाटचाल करतात. हे हे चुकलं, असं व्हायला नको होते, तसं व्हायला नको होतं,असाच विचार करत न बसता आता काय करणं, कोणत्या सुधारणा करणं आवश्यक आहे त्या कृती आणि सुधारणा करण्यासाठी नियोजन करून योग्य ती कृती आणि उक्ती करणे हा उपकारक मार्ग ठरतो.

विरोधकांच्या शब्दाला उत्तर देवू नये
काही जण म्हणतात, आता या भानगडीत पडायचेच नाही. असे करणे म्हणजे रस्त्यावर अपघात झाला म्हणून आता प्रवासच करायचा नाही, असा निर्णय घेणे होय. एक जण म्हणाला, ‘आपण कधीच घोड्यावरून खाली पडलो नाही.’ कारण काय म्हणून विचारले तर तो म्हणाला, ‘आपण कधीच घोड्यावर बसलो नाही.’ अशा कृतिशून्य माणसांच्या अभिप्रायाचा विचार करता कामा नये. गेममध्येही काही गेम असतात. मानसिकता डिस्टर्ब करण्याचे प्रयत्न होतात अशा वेळी  आपल्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होऊ देता कामा नये. अडवण्याची प्रयत्न होत असेल तर उडी मारून पुढे जाण्याची तयारी ठेवावी. प्रतिस्पर्धी, विरोधक तुम्ही पराभूत व्हावे म्हणून मेहनत घेतच असतात. आपण विजयासाठी मेहनत घेतली पाहिजे. विरोधकांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देत बसू नये.

नकारात्मकतेकडे दुर्लक्ष केले पाहिजे
नकारात्मक, द्वेषबुध्दीच्या विकृत माणसांकडे अनेकदा दुर्लक्ष करून आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे हाही शहाणपणाचा आणि हिताचा मार्ग ठरतो. कृतीने, यशानं दिलेले उत्तर हेच प्रभावी उत्तर असते. अनिवार्य प्रसंगी कायदेशीर आणि फायदेशीर उत्तर दिले पाहिजे.
- डॉ हनुमंत भोपाळे (समुपदेशक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.