धंदा ही खतम हुआ, अब हमने क्या करना?

file photo
file photo
Updated on

औरंगाबाद : ''धंदा ही खतम हुआ, अपना तो कुछ काम ही नहीं रहा। दूसरा धंदा करने को भांडवल कहांसे लाना? बीस साल इस धंदे मे गये, दूसरा धंदा सेट करने को पाच साल लगेंगे, उतनी तो हमारी जिंदगी भी नहीं रही। अब हमने क्या करना, असा सवाल 25 वर्षांपासून पेंटींग व्यवसाय करणारे मास्टर पेंटर एम. आय. अंजुम करतात.

पूर्वी एखाद्या दुकानाच्या नावाचा बोर्ड लिहायचा असो किंवा नवीन गाडीची नंबर प्लेट रंगवायची असो, थेट पेंटरच्या दुकानात जावं लागायचं. परंतु, गेल्या काही वर्षांपासून डिजिटलाईजेशन वाढल्यामुळे दुकानाच्या बोर्डची जागा बॅनर, फ्लेक्सने घेतली, तर गाडीच्या नंबर प्लेटवर रेडियमच्या चमकदार आकड्यांची नक्षी आली. यामुळे रंगकाम करण्यात हयात गेलेल्या कलाकारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.

पेंटरकाम शिकून 1994 मध्ये सेंन्ट्रल जकात नाक्यावर दुकान थाटले, तेव्हा पेंटर अंजुम यांचा व्यवसाय मस्त चालायचा. दिवसाला सात-आठशे रूपये मिळत होते. मात्र तीन-चार वर्षांपासून डिजिटलाइजेशन वाढल्याने व्यवसायच धोक्यात आला आहे. आता दिवसाला 200 ते 300 रुपये मिळणेही कठीण झाल्याचे ते सांगतात.

घराला रंग देण्याचे प्रमाणही घटले

दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. प्रत्येक जण घराच्या स्वच्छतेच्या तयारीला लागला आहे. पण पूर्वी साफसफाईसोबतच रंगरंगोटीदेखील होत असे. आता मात्र रंगकाम करून घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ''गेल्या महिन्यात घर रंगवण्याचं काम मिळालं होतं. त्यानंतर एकही काम मिळालं नाही. माझा सात जणांचा परिवार आहे. रंगकाम करून चार-पाच हजार मिळतात. यात घर कसं चालवावं? असंच सुरू राहिलं, तर हा व्यवसाय सोडून भाड्याची रिक्षा चालवावी लागेल,'' असं शेख अन्वर म्हणतात. सध्या धंद्यात खूप मंदी आली आहे. मी सकाळी आठ वाजता आलो. संध्याकाळपर्यंत फक्त वीस रूपये मिळाले आहेत. आजच मुलाच्या शाळेतून निरोप आला, 500 रूपये फीस भरायची आहे. आता धंदाच वीस रूपये झालाय, तर फीस कुठून भरू?'' असं एक कारागीर म्हणाला.

नविन रंगाने गेला धंद्याचा रंग

सध्या बाजारात नवनवीन रंग आले आहेत. यात काही महाग रंग असे आहेत, की एकदा घराला तो रंग दिला, की चार-पाच वर्ष तरी रंग देण्याची गरज पडत नाही. असे महागडे रंग वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. या नवीन रंगांमुळे आपल्या धंद्याचा रंग गेला असल्याचे पेंटर सांगतात. प्रत्येकाचे पोट भरत नसल्यामुळे अनेक चांगले कलाकार मिळेल ते काम करून जगत आहेत. काही मजुरी करतात, तर काही कंपनीमध्ये कामाला जातात, अशी वस्तुस्थिती असल्याचे येथील कारागीरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.