बीड भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकतीच राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग व शक्तिपीठांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा काढली. दर्शन या हेतूने काढलेल्या आठ दिवसांच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा पंकजा मुंडे यांच्या राजकीय शक्तीचा प्रत्यय होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यांच्या या परिक्रमेची व राजकीय शक्तीची दखल घेतली असून त्यांना लवकरच राज्याच्या परिघात सक्रिय केले जाणार असल्याची राजकीय जाणकारांची माहिती आहे.
यापूर्वी पंकजा मुंडे यांनी २०१४ साली राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. त्याचा फायदा राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला होता. त्याची दखल घेत पंकजा मुंडेंना भाजपच्या सुकाणू समितीमध्ये स्थान मिळाले होते. नंतर सत्तेत देखील प्रमुख खात्यांचे मंत्रिपदे मिळाली. भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा, आक्रमक वक्त्या, भाजपमधील प्रमुख ओबीसी लीडर अशी त्यांची राजकीय बलस्थाने पक्षांतर्गत विरोधकांना खुपू लागली.
त्यामुळे मंत्रिपदावर असल्यापासूनच त्यांच्या राजकीय खच्चीकरणाच्या परिक्रमेला सुरुवात झाली. त्यांच्याकडील काही खाते काढण्यापासून त्यांच्या खात्यातील माहिती विरोधकांना पुरविण्याचे कामही पक्षातूनच झाल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
दरम्यान, त्यांच्या विधानसभेतील पराभवाला देखील पक्षातूनच खतपाणी मिळाल्याची खदखदही समर्थकांच्या मनात कायम आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यसभा व विधान परिषदेसाठी पंकजा मुंडें ऐवजी कधी काळी त्यांचे समर्थक राहिलेल्या डॉ. भागवत कराड, रमेश कराड यांना संधी मिळाली.
विशेष म्हणजे एकावेळी तर पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या अर्जाची तयारी केलेली असताना टाळले. एकूणच त्यांना वारंवार टाळल्याने त्यांचे समर्थक भाजपवर नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनीही अनेकदा आपली नाराजी बोलून दाखविली. ‘दुसऱ्यांच्या जबाबदारीत नाक खुपसण्याची सवय नसल्याचे’ सांगत राज्यात त्या सक्रिय नसल्याचे कारणही त्यांनी या परिक्रमेच्या निमित्ताने स्पष्ट केले.
यापूर्वीच त्यांनी मोदी व शहाच आपले नेते असल्याचेही निक्षून सांगितले असून आपल्या भवितव्याबाबत त्यांनाच बोलणार असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, पवित्र श्रावण मासानिमित्ताने त्यांनी राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग व शक्तिपीठांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा काढली. ता. चार ते ११ या आठ दिवसांत पाच हजार किलोमीटर अंतराच्या परिक्रमेच्या निमित्ताने त्यांचे सर्वत्र भव्यदिव्य स्वागत झाले. समर्थकांची गर्दी आणि भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांची शिवशक्ती परिक्रमेला उपस्थिती हे या परिक्रमेचे वैशिष्ट्य ठरले.
कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला
शिवशक्ती परिक्रमा यात्रेदरम्यान विविध ठिकाणच्या भाषणांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील सल देखील बोलून दाखविली. नव्या राजकीय समीकरणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा दावा होऊ शकतो.
त्यामुळे पंकजा मुंडे कुठून लढणार असा पेच आहे. मात्र, आपण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढविणार नाही हे देखील त्यांनी निक्षून सांगितले. दरम्यान, एकूणच या गर्दी आणि उत्स्फूर्त स्वागतामुळे पंकजा मुंडे यांच्या चाहत्यांचा उत्साह दुणावला असून आता याची दखल श्रेष्ठींनी घेतल्याची माहिती आहे. त्यांची आगामी वाटचालीतील गरज लक्षात घेऊन त्यांना लवकरच राज्याच्या परिघात सक्रिय केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.