बीड : विधानसभा निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चित करणाऱ्या राष्ट्रवादीने राज्याच्या सत्तेतही वाटा मिळविला. राज्यात मंत्रीपदानंतर राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद आणि जिल्हा परिषदेचीही सत्ता आली आहे. एकूणच राष्ट्रवादीने पट मांडून आपली पहिली चाल खेळून झाली आहे. आता माजी मंत्री पंकजा मुंडे कोणती चाल खेळणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजप जिल्हाध्यक्षांची निवड, सभापतींच्या निवडीतील भूमिकेसह त्यांनी घोषणा केलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद॒घाटन आणि औरंगाबादचे उपोषण याकडेही आता समर्थकांचे लक्ष लागले आहे. याबाबत चिकीत्साही होत आहे. या वाटचालीवरच आता पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
परळीतून पराभव झाला असला तरी पंकजा मुंडे यांच्या मास लिडर असण्याबाबत कोणीच शंका घेऊ शकत नाही. गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याचा वारसाही त्यांच्याकडे आहे. पण, राजकारण टिकवून ठेवणे आणि अपयशातून यशाचा पल्ला गाठण्यासाठी लोकसंपर्क, सातत्य आणि योग्य दिशेने पावले पडणे महत्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या प्रतिकुल राजकीय परिस्थितीत वरिल खेळ्या पंकजा मुंडे कशा खेळणार यावर बरेच काही अवलंबून आहे.
सत्तेतली राजकीय पोळी भाजून घेतली कुणी?
मागच्या पाच वर्षांत जिल्ह्यात राष्ट्रवादी दुबळी होती. जिल्ह्यातून त्यावेळी असलेले एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे देखील त्यांच्याच तंबूत अधिक असत. त्यामुळे राष्ट्रवादीवर कुरघोड्या करतानाच मित्रपक्षांनाही त्यांनी गुमानले नाही. काही शिलेदारांनी पक्षाच्या बळकटीपेक्षा विनायक मेटे यांच्यासारख्यांचा बागुलबुवा करुनच सत्तेतली पाच वर्षे आपली राजकीय पोळी भाजून घेतली.
काही इंटरेस्टिंग बातम्या -
भ्रमाचे अनेक भोपळेही तयार करुन दाखविले. पण, सत्तेमुळे सर्वकाही सपादूनही गेल्या. मात्र, गाडी उताराला लागल्यानंतर लोक झपाझप उड्या कसे मारतात हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी त्यांना दिसून आले. पण, आता त्यावर त्या काय उपाय योजना करतात यावर सर्वकाही अवलंबून आहे.
औरंगाबादला उपोषण
विधानसभा निवडणुकीतील पराभावनंतर त्या मतदार संघात आल्या त्या थेट दिवंगत गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीला. समाज, वारसा सोबत असला तरी लोकसंपर्क तितकाच महत्वाचा असतो हे आता लक्षात यायला हवे. दरम्यान, या दिवशी त्यांनी विरोधकांइतकेच अप्रत्यक्ष भाजपर वार केले. भविष्यातील राजकीय वाटचालीत याचा फायदा कि तोटा याचा कदाचित त्यांनी विचार केलेला असावा.
पण, त्यांनी त्या दिवशीच भाजपच्या राज्य सुकाणू समितीतून बाहेर पडून गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत खरा हाच महत्वाचा टप्पा असणार आहे. ता. 26 जानेवारीला मुंबईत प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद॒घाटन आणि 27 जानेवारीला औरंगाबादला उपोषण अशा त्यांच्या महत्वाच्या दोन घोषणा आहेत.
सोबत कोण राहणार?
मागच्या पाच वर्षांच्या काळात पंकजा मुंडे सत्तेत आणि महत्वाच्या खात्यांच्या मंत्री होत्या. त्या काळात गोपीनाथगड आणि सावरगाव घाट या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना भाजपसह इतर पक्षांचे सोलापूरपासून बुलढाण्यापर्यंतचे आणि इकडे नांदेडपासून ते नाशिक, पुणे, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार हजेरी लावत. त्यामुळे सत्ताकाळात खुर्च्या उबविणारे आता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाटचालीत सोबत कोण राहणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गुंता कायम - जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण?
जिल्हा पातळीवरील राजकारणाचा महत्वाचा टप्पा म्हणजे आता आठ दिवसांनी जिल्हा परिषद सभापतींच्या निवडी आहेत. भलेही त्यात यश येऊ वा अपयश पण प्रयत्न कसे करणार हेही महत्वाचे ठरणार आहे. भाजप जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना देखील केवळ नेहमी मागे - पुढे हारतुरे घेऊन फिरणारे, कानात गुजगोष्टी सांगणाऱ्यांना त्या निवडतात कि निष्ठा, जेष्ठता आणि राजकीय गणित मांडतात हेही महत्वाचे ठरणार आहे.
आता राष्ट्रवादी सत्तेत आणि धनंजय मुंडे मंत्री आणि पालकमंत्री आहेत. जिल्हा परिषदेची सत्ताही त्यांच्याकडे असून काही महिन्यांनी जिल्हा बँकेचीही निवडणुक होणार आहे. या तगड्या आव्हानांचा सामना करताना पंकजा मुंडे कशी वाटचाल करणार हे पहावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.