सोनपेठ (परभणी) : शहराच्या बाजूला सुरु असणाऱ्या २५ पेक्षा जास्त वीट भट्ट्यां या सर्वच अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच भट्ट्यांमधून निघणाऱ्या अतिविषारी धुरामुळे सोनपेठकरांचा जीव मात्र गुदमरत असून श्वास घेणे देखील अवघड झाले आहे. याकडे स्थानिक प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
सोनपेठ शहरातून वाहणाऱ्या वाण नदीच्या काठावर गेल्या अनेक वर्षांपासून असंख्य अनधिकृत वीट भट्ट्यांचा विळखा पडला आहे. या वीट भट्ट्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे शहरातील इनामदार कॉलनी, कुरेशी मोहल्ला, ढोर वेस, विठ्ठल मंदिर परिसर, रामेश्वर मंदिर परिसर, देवी मंदिर परिसर, ब्राह्मण गल्ली, संभाजी नगर व सोनखेड यासह शहरातील अर्ध्याहून अधिक भागात नागरिकांना सायंकाळ पासून सकाळपर्यंत श्वास घेणे अवघड झाले आहे. संध्याकाळ होताच या परिसरात धुराचे लोट पहावयास मिळतात.
या धुरामुळे लहान मुले, आजारी नागरिक तसेच वृद्ध नागरिकांना श्वसनाच्या मोठी गंभीर समस्येशी तोंड द्यावे लागत आहे. दमा, श्वसनाचे रोग यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले असून त्याच्या इलाजासाठी दवाखान्यात चकरा मारत आहेत. धुरामुळे दम लागणे, दम कोंडणे अशा आजारात कमालीची वाढ झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसात प्रदूषित जड हवा वातावरणात उशिरापर्यंत राहत असल्याने नागरिकांना श्वास घेणे अवघड झाले आहे.
कोरोनासारख्या संसंर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असतांना हवेतून शुद्ध ऑक्सिजन मिळावा म्हणून सर्वत्र हालचाली असतांना सोनपेठ शहरात मात्र अनधिकृत वीट भट्ट्यांमधून विषारी वायू पसरला जात असल्यामुळे असंख्य नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. याबाबत अनेक जागरूक नागरीकांनी प्रशासनाकडे याआधी तक्रारी केल्या असून प्रशासन मात्र या अनधिकृत वीट भट्टी धारकांना का पाठीशी घालत आहे? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
कारवाई कोण करणार?
संबधित अनधिकृत तब्बल २७ वीट भट्ट्या नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. तर यांना परवानगी देणे व इतर बाबी महसूल प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हे दोन्ही विभाग अनधिकृत वीट भट्ट्यांवर कारवाईची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्यामुळे या वीट भट्ट्यांवर कारवाई कोण करणार? व नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची? याबाबत शहरातील काही राजकीय वरधहस्तामुळे देखील या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याची चर्चा केली जात आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.