जिंतूर : मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. ३) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाला. तालुक्यातील येलदरी जलाशयाचा ठेका स्व. राजीव गांधी मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. बामणी यांना सुटलेला असून, त्यांनी पी.पी.पी. करार करून महाराष्ट्र फिश कंपनीला भागीदार केलेले आहे.
सदर मच्छीमार संस्था व कंपनीचे सर्व भागीदार हे धनदांडगे असून, ते स्थानिकच्या गरीब मच्छीमारांवर सतत अन्याय- अत्याचार करत आहेत. तसेच जिंतूर व सेनगाव तालुक्यातील जलाशयानजीकच्या गावातील स्थानिकचे तीन हजार मच्छीमार असताना सदर कंपनीने परप्रांतीय मच्छीमार कामाला लावले आहेत, त्यामुळे स्थानिक मच्छीमार बेरोजगार होत आहेत. याबाबत मच्छीमारांनी वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून देखील प्रश्न सुटला नाही, असेही मोर्चेकरांनी सांगितले. विजय भांबळे म्हणाले की, ‘‘सदर संस्था ही नावाला असून, संस्थेचे खरे सूत्रधार भाजपचे विद्यमान व माजी आमदार आहेत. मत्स्यविभागास हा मोर्चा म्हणजे पूर्व सूचना असून मच्छीमारांवर होणारे अन्याय तत्काळ न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छिमारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल.’’
या प्रसंगी प्रसादराव बुधवंत, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, मनोज थिटे, बाळासाहेब भांबळे, गणेशराव इलग, शरद मस्के, विजय खिस्ते, शरद अंभुरे, मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानिमिया, संजय निकाळजे, चंद्रकांत बहिरट, आशाताई खिल्लारे, खयुम कादरी, अविनाश मस्के, शाहेद सिद्दिकी, माधव घोगरे, किशन मानवते आदी उपस्थित होते.
या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा
मच्छीमारांनी पकडलेले गावरान मासे कमिशन बेसवर देण्यात यावेत. मच्छीमारांना स्व. राजीव गांधी मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. बामणी यांचे सभासद करून घेण्यात यावे. परप्रांतीय मच्छीमारांना मच्छीमार करण्यास बंदी घालण्यात यावी. संस्थेचे बोगस पदाधिकारी निलंबित करून सदर संस्था काळ्या यादीत टाकण्यात यावी. संस्था रजीष्ट्रेशनसाठी बोगस प्रमाणपत्र लावलेल्या सभासदांवर व पदाधिकाऱ्यांवर कलम ४२० नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.