परभणी/हिंगोली : जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सोमवारी (ता. १८) दुपारपर्यंत कायम होती. हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणात सकाळी आठपर्यंत ६२.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. नदी, ओढ्या काढच्या शेतजमिनींमध्ये आठवडाभरापासून पाणी कायम आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने वसमत तालुक्यातील १५ हजार ९४४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आता परत दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसाने तीन दिवस विश्रांती घेतली. परत रविवारपासून पाऊस सुरू झाला आहे. नुकतेच शेतकऱ्यांना आंतरमशागतीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, परत सुरू झालेल्या पावसाने जमिनीत वाफसा नसल्याने कामे रखडली आहेत. सतत होणाऱ्या पावसाने पिकांची वाढ खुटंली असल्याचे शेतकरी सांगत होते.
हिंगोली जिल्ह्यात
६०.१३ टक्के पाऊस
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ५१६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.१३ टक्के इतका पाऊस पडला. जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. हिंगोली ४२ (५४१) मिलिमीटर, कळमनुरी ४८.३० (६१७) मिलिमीटर, वसमत ३२.४० (५३२.५०) मिलिमीटर, औंढा नागनाथ ४७.२० (४६६.५०) मिलिमीटर, सेनगाव २९.४० (४०५.३०) मिलिमीटर पाऊस झाला आहे.
येलदरीत ६२ टक्के जलसाठा
जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलाशयात सोमवारी सकाळी आठपर्यंत ६२.१८ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पूर नियंत्रण कक्षाकडील माहितीनुसार येलदरी प्रकल्पातील मृतसाठ्याची क्षमता १२४.६७० दशलक्ष घनमीटर, जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ८०९.७७० दशलक्ष घनमीटर एवढी आहे. एकूण पाणीसाठ्याची क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर आहे. सोमवारी सकाळी धरणाच्या जलाशयात ६२८.२४३ एकूण पाणीसाठा तर ५०३.५७३ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या चोवीस तासांत जलाशयात ४.९७४ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असल्याने या आठवड्यात फक्त साडेपाच टक्के वाढ झाली आहे.
पैनाकाठच्या रहिवाशांनो, सतर्क राहा!
कळमनुरी : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी पाऊस झाला. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोचला. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचे आवक पाहता पूर नियंत्रण कक्षाकडून पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, तसे पत्र तहसीलदारांना देण्यात आले. सद्यःस्थितीत इसापूर धरणाची पाणी पातळी ४४०.६० मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ७२२.२७ दलघमी आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखडा ७५ टक्के विश्वासार्हतानुसार ३१ जुलैपर्यंत धरणाची पाणी पातळी ४४०.१२ मिटर ९१.४३ टक्के ठेवावी लागणार आहे. धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाणी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणाचे वक्रद्वारे उघडून सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी नदी पात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकात पाणी जमा झाले. त्याचा निचरा झाला नसल्याने पीक पिवळे पडून वाढ खुंटली. आता आंतरमशागत करता आली नाही. परत सुरू झालेल्या पावसाने अडचणी निर्माण झाली आहे.
- प्रकाश काळे, शेतकरी, हिंगोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.