जिंतूर : ‘‘अश्विनी तुझ्यामुळे मला पुनर्जन्म मिळाला. तू होतीस म्हणून मी आज वाचलेय. नाही तर आपली कायमची ताटातूट झाली असती,’’ असं म्हणत कोमल तिची मैत्रीण अश्विनीच्या गळ्यात पडून रडत बोलू लागली. अश्विनीचाही कंठ दाटून आला. दोघींनाही भावना अनावर झाल्या होत्या. त्याचे झाले असे की विहिरीत पडलेल्या कोमलला अश्विनीने मोठ्या धाडसाने वाचवले.
कोरवाडी (ता. जिंतूर) येथील अश्विनी आलाटे आणि कोमल आलाटे या दोघी शुक्रवारी (ता. नऊ) शेतात बोरं खायला गेल्या. दोघींनी मनसोक्त बोरं खाल्ली. नंतर तहान लागली म्हणून दोघी शेजारच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेल्या. त्यावेळी कोमलने अश्विनीला पळसाची पाने आणण्यास सांगितले. तोपर्यंत कोमल विहिरीच्या आत उतरून पाण्यात डोकावून पाहू लागली. तोच तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. ‘‘मायो ऽऽऽ’’ एवढाच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला. ती पाण्यात पडल्याचा धपक्कन आवाज अश्विनीच्या कानावर आला. ती विहिरीकडे धावली. तिला गटांगळ्या खाताना पाहून अश्विनीचा आवाज एकदम निघाला नाही. तरीही तिनं शेजारच्या बायांना आवाज देण्याचा
प्रयत्न केला. कोमल गटांगळ्या खात होती. अश्विनीचे लक्ष शेजारच्या दोरीकडे गेले. तिने वेळ न घालवता लगेच पाण्यात दोरी फेकली. दोन वेळा दोरी फेकली तरी कोमलच्या हाताला लागली नाही, म्हणून तिनं दोरी कोमलच्या तोंडावर फेकली.
कोमलने दोरीला गच्च पकडलं. अश्विनी दोरीला धरून ओढू लागली. पण, अश्विनीला कोमलला तोलणं अवघड जात असल्याने दोघींनीही दोरी धरून ठेवली. अश्विनीने शेजारच्या मैत्रिणीला आवाज दिला. तीपण धावत आली. दोघींनी कोमलला पाण्यातून वर काढलं. तेव्हा कोमल खूपच घाबरली होती. दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या. ‘‘कोमल.. कसं झालं गं? कशी पडली तू?’’ ‘‘काय झालं मलाच कळलं नाही.’’ ‘‘बाई, अश्विनी तू होतीस म्हणून मी वाचली, नाही तर मी आज तुला दिसले नसते. तू मला नवा जन्म दिलीस.’’ असे म्हणत कोमल रडू लागली. अश्विनीही भावुक होत म्हणाली, ‘‘चल आता घरी. घरी बोलूया!’’ असे म्हणत त्या घरी आल्या.
अश्विनीच्या धाडसाचे कौतुकच. स्वतःला पोहता येत नसतानाही तिने धाडसाने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोमलला वाचविले. सध्या शिवारात विहिरी भरलेल्या आहेत. लहान मुलांची काळजी घ्या. पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावे.
- अंबादास घळगीर, शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.