परभणी : नवरात्र महोत्सवात नागरिकांना पथदिवे, पाणी, स्वच्छता आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी कर्मचाऱ्यांना दिले. शहरात नवरात्र व दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात सोमवारी (ता. २६) देवीची स्थापना झाला. ता पाच ऑक्टोबरला दसरा आहे. या दरम्यान शहराची स्वच्छता, रस्त्यावरील पथदिवे, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था नियमित करावी. रस्त्यावरील खड्डे बुजवणे, मिरवणुकीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह जलशुद्धीकरण केंद्र येथे विसर्जन व्यवस्था करण्याचे आदेश महापालिका प्रशासक सांडभोर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
या संदर्भात आयुक्त श्रीमती सांडभोर यांनी बैठक घेऊन हे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त मनोज गग्गड, शहर अभियंता वसीम पठाण, पाणीपुरवठा विभाग प्रमुख तन्वीर मिर्झा बेग, मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद, करण गायकवाड, विकास रत्नपारखे, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी आदी उपस्थित होते. पाणी सोडण्याचे वॉल्व्हवर झाकण लावावे, दुर्गा देवी विसर्जनाची व्यवस्था जलशुद्धीकरण केंद्र येथे करावी. प्रभाग समित्यांनी सर्व कामांची व्यवस्था होत असल्याची खात्री करून घ्यावी. भांडार विभागाने दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी स्टेडियम कॉर्नर, खंडोबा बाजार, आशीर्वादनगर, विसावा जिंतूर रोड, मोठा मारोती मंदिर व दत्तधाम, संत तुकाराम कॉलेज येथे स्वागत कक्ष स्थापन करावेत व पानसुपारी आदींची व्यवस्था करावी.
आस्थापना विभागाने मुख्य कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करावा, शहरात देवी असलेल्या ठिकाणी रोज स्वच्छता करावी. कोंडवाडा विभागाने नवरात्र महोत्सव पूर्ण होईपर्यंत व मिरवणुकीच्या वेळेस मोकाट जनावरे फिरणार नाहीत या बाबत दक्षता घ्यावी. अग्निशमन विभागाने २४ तास सज्ज राहावे. जलशुद्धीकरण केंद्र येथे लाइटची व्यवस्था करावी.
शहरातील सार्वजनिक दुर्गा महोत्सव मंडळानी प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत एक खिडकी योजनेतून परवानगी घ्यावी, असे आवाहन श्रीमती सांडभोर यांनी केले आहे.
औपचारिकता म्हणून सूचना?
महापालिकेने गणेशोत्सव काळातदेखील याच सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु, न रस्त्यावरील अतिक्रमणे हटली, न मोकाट जनावरे. मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्नदेखील कायम होता. पिण्याच्या पाण्याच्या वेळासुद्धा अजूनही निश्चित नसून अनेक भागातील पथदिवे अजूनही बंद आहेत. महापालिका केवळ औपचारिकता म्हणून कर्मचाऱ्यांना सूचना तर देत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.