परभणी : येथील नवा मोंढ्यात रोज शेकडो जड, हलक्या वाहनांची ये-जा, हजारो व्यापारी, ग्राहक, शेतकऱ्यांचा राबता असतो. परंतु, रस्त्यांची मात्र अत्यंत दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यात खड्डे व दलदलीच्या रस्त्यामुळे तर व्यापारी, ग्राहकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. नव्हे रस्त्यांमुळे ग्राहकांनीच या भागात खरेदीकडे पाठ फिरवली. चा परिणाम या भागातील व्यापारावर झाला आहे.
येथील नवामोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आडत दुकाने, शेती विषयक औषधी, साहित्याची दुकाने, ठोक व घाऊक भुसार मालांची शेकडो दुकाने आहेत. निवासस्थाने, शासकीय कार्यालयांची संख्यादेखील मोठी आहे. त्याच बरोबर गृहोपयोगी साहित्याची, कपड्यांची दुकानेही या भागात आहेत. दरम्यान, शेकडोंच्या संख्येने जड व हलकी वाहने रोज खेडोपाड्यातून तसेच परजिल्हा, परराज्यातून भुसार मालासह अन्य साहित्य घेऊन येत असतात. त्यामुळे नवा मोंढा भागात वाहनांची, ग्राहकांची, कर्मचाऱ्यांचा रोजच मोठा राबता असतो.
पावसाळ्यात चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक, व्यापाऱ्यांचे तर हाल होतच आहेत. परंतु, त्याच बरोबर त्यांना दुर्गंधीलाही सामोरे जावे लागत आहे. अशा रस्त्यांमुळे असो की अन्य काही कारणामुळे या भागात घंडागाड्या फिरत नसल्याची माहिती असून, त्यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. कचरा सडल्यामुळे परिसरात येणाऱ्या नागरीकांना दुर्गंधीचादेखील सामना करावा लागत आहे.
महापालिकेचे दुर्लक्ष
पावसाळ्यात या रस्त्यांना गटाराचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून, रस्त्यांवर चिखलाचा ढेरा साचलेला आहे. व्यापाऱ्यांची माल घेऊन येणारी वाहने गरज म्हणून कशीबशी येत आहेत. मात्र खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. एकतर कसरत करूनच दुकाने गाठावी लागत आहेत व दुसरे रस्त्यांवरील पाणी उडाल्यामुळे चिखलाने भरूनच घरी जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी पर्यायी दुकाने शोधून नवामोंढ्यातील खरेदीकडे पाठ फिरवल्याचे देखील चित्र आहे.
वास्तविक पाहता या परिसरात उच्च दर्जाचे सिमेंट रस्त्यांची आवश्यकता आहे. परंतु, सिमेंटचे तर सोडा साधे गिट्टी, डांबराचे रस्ते तरी होणे गरजेचे असून या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याची चित्र आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात होते त्याही ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे परिसरातील व्यापारी देखील त्रस्त झाले आहेत. शिवाय तक्रार केल्यास, आंदोलन केल्यास दुसराच ससेमिरा मागे लागेल म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असल्याचे दिसून येते.
या भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चोहोबाजूंनी रस्ता आहे, तसेच अंतर्गत रस्तेदेखील आहेत. त्याच बरोबर शहरातून जिंतूररोड या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारेही चार रस्ते आहेत. अपवाद वगळता बहुतांश रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यास चाळण म्हणणेदेखील अवघड असून, या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. तीन-चार नव्हे पाच-दहा फुटांचे खड्ड्यांमुळे छोट्या-मोठ्या वाहनांसाठी हे खड्डे धोक्याचे ठरत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असून, अनेक रस्त्यावरील, सिमेंट, डांबर, गिट्टी कधीचीच उडून गेलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.