Parli Vaijnath Drought : परळीची वाटचाल दुष्काळाकडे; २९ टक्केच पाऊस

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरीही तालुक्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या ५० टक्के सुद्धा पाऊस पडला नाही.
Parli Agriculture
Parli Agriculturesakal
Updated on

परळी वैजनाथ - पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरीही तालुक्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या ५० टक्के सुद्धा पाऊस पडला नाही. यामुळे कापूस, सोयाबीन, उसासह इतर पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांचे डोळे रोज येणाऱ्या आभाळाकडे लागले आहेत. भर पावसाळ्याच्या दिवसात प्रचंड उकाडा वाढला आहे. आजपर्यंत हवामान खात्याने सांगितलेले सर्व अंदाज बाद झाले आहेत. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ८ जूनला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. मात्र तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. ती पण रिमझिम. संपूर्ण आठवडाभर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस जोरदार बरसला.

मराठवाड्यात व यातही परळी तालुक्यात रिमझिमच्यावर कधीही पाऊस पडला नाही. जुलै महिन्यात तरी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज होता. जुलै महिना संपला, आॅगस्ट महिन्यातील १२ दिवस निघून गेले. पण, पाऊस पडला नाही.

पेरणीस उशीर होत असल्याने कमी ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या. काही ठिकाणी थोडक्या ओलीवर पिकांची उगवण झाली. तर, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पिकांची उगवण झाल्यानंतर आगामी काळात चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी अंतर मशागतीच्या कामाला सुरुवात केली. खते घातली.

सर्व कामे उरकली. पण, पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी या दिवसांत तालुक्यातील अनेक लहान- मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यंदा दोन महिन्यात एकही जोरदार पाऊस पडला नसून, आजपर्यंत तालुक्यात फक्त २९ टक्के पाऊस पडला आहे.

तालुक्यातील हेक्टरनिहाय पीकपेरा

  • सोयाबीन - ३५ हजार

  • कापूस - १३ हजार

  • ऊस - ८-९ हजार (अंदाजे)

  • तूर - ३,८१०, मूग - १७३

  • उडीद - २९, भुईमूग - ०

  • बाजरी - ८८४

  • खरीप ज्वारी - १५४

तीन वर्षांनंतर यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन तसेच उसाची वाढ खुंटली आहे. आजपर्यंत मी पाहिलेल्या काळात सलग दोन महिने जोरदार पाऊस न पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१८ मध्ये दुष्काळ पडला होता. तरी, त्यावर्षी अधूनमधून जोरदार पाऊस पडला होता. जुलै महिन्यात काही दिवस रिमझिम पाऊस पडला. यामुळे पिकांची वाढ झालेली नाही. आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे दुष्काळ जाहीर करुन पीकविमा लागू करावा.

- अंकुश गंगणे, शेतकरी, गाडे पिंपळगाव

यावर्षीचा मोसमी पाऊस उशिरा झाल्याने खरीप पेरणी एक महिना उशिरा झाली, त्यानंतरही पिकांना पूरक असा पाऊस झाला नाही. सध्यातर मोठी उघडीप दिल्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. शेती मशागत, खत, बियाणे, फवारणी आदींसाठी झालेला खर्च व धोक्यात आलेली पिके यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. शासनाकडून तत्काळ भरीव मदत देण्यात यावी.

- धनंजय सोळंके, शेतकरी, नागापूर

सुरुवातीपासूनच रिमझिम पावसावर पेरणी व लागवड केली आहे. सध्या सोयाबीन व कापसाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. एकदोन दिवसात पाऊस नाही पडला नाही तर सोयाबीन हातचे जाईल. काही ठिकाणी सोयाबीनला फुले लागत आहेत. माल लागण्यासाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पिकांची वाढ खुंटल्याने सोयाबीन, कापसाला उतारा येणार नाही. म्हणजे पेरणीसाठी खर्च निघणेही अवघड झाले आहे.

- गणेश फुटके, शेतकरी, गाडे पिंपळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.