धाराशिव : मोफत शिक्षणाचा अधिकारांतर्गत (आरटीई) निवड झालेल्या २२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या धाराशिव तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचेही आदेश दिले आहेत.
‘आईटीई’अंतर्गत निवड यादीप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना पडताळणी समितीने १५ दिवसांनी अपात्र केले. त्यांच्याजागी उत्पन्न कर भरणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याचे काम या समितीने केले. इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेश देत नव्हत्या. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दाद मागितली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधित अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देण्याचे आदेश दिले; तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दंडाची शिक्षा ठोठावली.