शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने असलेल्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी पडली आहे.
परभणी - शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने असलेल्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी पडली आहे. तिच्या नियंत्रणासाठी कपाशीची फरदड घेण्याचा मोह शेतकऱ्यांना टाळावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, बीड मधील अंबाजोगाई, परळी, केज, जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, जाफ्राबाद, बदनापूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण आदी तालुक्यात प्रक्षेत्र भेटी दिल्या. त्यावेळी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ४ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान दिसून आला. हा प्रादुर्भाव पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
कापसाला चांगला उठाव असल्याने शेतकरी कपाशीचे पीक काढण्याऐवजी पाणी व खताच्या मात्रा देऊन कपाशीचा पूर्णबहार (फरदड) घेण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी (सिंचन) देऊन पुन्हा कापूस पीक घेतले जाते. फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायद्याची वाटते.
असा होतो बोंडअळीचा प्रादुर्भाव
या पद्धतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. असे आवाहन कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.
या उपाययोजना गरजेच्या
कपाशीची फरदड घेऊ नये.
वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशीचे पीक ठेवू नये.
हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात.
हंगाम संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा बंदोबस्त करावा.
शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये.
कारण पऱ्हाटीत गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात.
रोटोवेटरऐवजी चुरा करणारे यंत्र श्रेडरच्या सहाय्याने पऱ्हाटीचा बारीक चुरा करून कंपोष्ट खतासाठी उपयोग करावा.
जिनिंग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळ्याचा वापर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.