परभणी : स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाची मुख्य इमारत नापास ठरवण्यात आली असली तरी सद्यस्थितीत तेथे मोठ्या संख्येने खेळाडूंसह अनेकांचा वावर आहे. एखादी दुर्घटना झाल्यास मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे यंत्रणेने याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
साधारणता ५० वर्षांपूर्वी बांधलेली जिल्हा क्रीडा संकुलाची मुख्य इमारत आता अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. इमारतीच्या भिंती जागा सोडू लागल्या असून छत देखील कोसळू लागली आहेत तर काही भिंती पाणी मुरल्यामुळे फुगल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे तिथे येणाऱ्या खेळाडूंसह अनेकांना भीतीच्या सावटाखालीच वावरावे लागते. सध्या तर शालेय क्रीडा स्पर्धांचा हंगाम आहे.
दररोज मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक त्याचबरोबर क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर कार्यालयाशी निगडित कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. कधी इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळून डोक्यावर पडेल, कधी पाण्याने फुगलेली, कललेली भिंत कोसळेल याचाही नेम नाही. त्यामुळे या इमारतील वावर धोकादायक ठरण्याचीच दाट शक्यता आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत फेल
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. त्यासाठी जवळपास दोन लाख रुपये शुल्क देखील लागले. या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात ही इमारत व्यक्तीला थांबण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले होते.
या अहवालाची माहिती नावंदे यांनी जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ कार्यालयाला देखील दिली होती. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हलवण्यासाठी देखील हालचाली सुरू केल्या होत्या. पुढे काय झाले हे माहीत नाही, परंतु ना कार्यालय हलले न वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्याचे दिसून येते.
काय झाले १५ व ११५ कोटींचे?
शासनाने क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी १५ कोटी रुपये जाहीर केले होते. परंतु, ते अद्यापही मिळालेले नाहीत तर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी संकुलाची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्यावर सहा मजली अद्ययावत इनडोअर हॉलसह सुसज्ज इमारत उभारणीसाठी शासनाकडे ११५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते.
विशेष म्हणजे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची देखील मंजुरी घेतली होती. परंतु, पालकमंत्र्यांचे देखील या प्रस्तावासह क्रीडा संकुलाची दुरावस्था व अन्य खेळ सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २५ एकर जागेचा देखील प्रश्न अद्याप तसाच लटकलेला आहे.
क्रीडा संकुलाच्या इमारतीचे बांधकाम १९७४ ला झाले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. येथील संकुलाची दयनीय अवस्था पाहून सुरवातीला रिनीव्हेशन साठी १५ करोडचा निधी मागितला होता. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर सुधारित ११५ कोटींच्या निधीची मागणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बनवण्यासाठी करण्यात आली आहे. सध्या तो विषय प्रलंबित आहे.
— कविता नावंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी
शासनाने क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये जाहीर केले आहेत. इमारत धोकादायक आहे म्हटल्यावर जुनी इमारत जमीनदोस्त करावी व त्या पैशातून जितके काम होईल ते करून घ्यावे व उर्वरित निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. तसेच जुन्या इमारतीतील खेळाडूंचा वावर कमी करावा. दुर्घटना झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
— रणजीत काकडे जिल्हाध्यक्ष, परभणी जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.