लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्था पीएम किसान योजनेत ई - केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यातून एकदा मिळणाऱ्या दोन हजार रूपयाच्या लाभापासून वंचित रहावे लागणार होते. जिल्ह्यात ई - केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित सेवा पंधरवाड्यात तलाठी व ग्रामसेवकांनी हे काम ऐरणीवर घेऊन वेगाने केले.
यामुळे जिल्ह्यातील तब्बल वीस हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. उद्दिष्ट घेऊन काम केल्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला असून उर्वरित लाभार्थींत आता अपात्र शेतकऱ्यांचाच समावेश असल्याचे दिसत आहे.
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना चार महिन्यातून एकदा दोन हजार रूपये अनुदान देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. काही शेतकऱ्यांच्या बँक खाते व अन्य तपशीलात तफावत आढळून आल्याने त्यांचे अनुदान बंद पडले होते. यामुळेच सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई - केवायसी करण्याचे बंधन घातले होते. आधार क्रमांक टाकून ही ई - केवायसी करणे आवश्यक होते.
याची माहिती असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःहून ई - केवायसी केली. ग्रामीण भागात आपले सरकार तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील सेवा केंद्रातून ई - केवायसीचे काम सुरू होते. तरीही मोठ्या संख्येने शेतकरी ई - केवायसी करण्याचे राहिले होते. ई - केवायसी न केल्यास अनुदानाचा लाभ मिळणार नव्हता.
यामुळे सेवा पंधरवाड्यात हे काम करण्याचे नियोजन प्रशासनाने केले. यात ग्रामसेवकांवर मोठ्या संख्येने ही जबाबदारी देण्यात आली. ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्रातून राहिलेल्या शेतकऱ्यांना संपर्क साधून ई - केवायसीचे काम फत्ते केले. जिल्ह्यात तीन लाख १० हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार संलग्न असून आतापर्यंत दोन लाख ६६ हजार ९८ शेतकऱ्यांची ई - केवायसी पूर्ण झाली आहे.
यातूनच वीस हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरल्याची माहिती प्रशासनाच्या सुत्रांनी दिली. ई - केवायसी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण ८६ टक्के आहे. ४४ हजार शेतकऱ्यांची ई - केवायसी राहिली असून यात मयत, आयकर भरणारे, एकाच कुटुंबांतील पती किंवा पत्नी व अन्य अपात्र लाभार्थी असण्याची शक्यता आहे.
जमिनीचा तपशीलही अपडेट
पीएम किसान योजना सुरू झाल्यानंतर लाभार्थींचा जमिनी तपशील ऑनलाईन करण्यात आला होता. कालांत्तराने तपशीलात बदल झाला आहे. विक्री, वाटणी व अन्य कारणांमुळे जमिनीच्या मालकीत बदल झाला होता.
यामुळे लाभार्थींचा जमिनीचा तपशील पुन्हा अपडेट करण्याचे आदेश होते. हे कामही तलाठ्यांनी सेवा पंधरवाड्यात जोमाने उरकले. एकूण दोन लाख ९८ हजार २३१ शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील अपडेट करण्यात आला असून १९ हजार ९६७ शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील अपडेट करण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.