औरंगाबाद: मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक सहा बालकामागे एकाचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो. त्यामुळे न्यूमोनियावरील न्यूमोकोकल लस आता एका वर्षाखालील बालकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेला दोन हजार लसी प्राप्त झाल्या असून, महापालिकेच्या ३८ आरोग्य केंद्रांवर ही लस लवकरच दिली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी (ता. सहा) सांगितले.
लसीकरणासंदर्भात डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, एका वर्षाच्या आतील बालकांनाच मोफत न्यूमोकोकल लसीचा डोस दिला जाणार आहे. दिड महिना, साडेतीन महिने, नऊ महिने असे लसीचे टप्पे असतील. यापूर्वी ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होती. प्रत्येक डोसला पाच हजार रुपये मोजावे लागतात. तीन डोससाठी साधारणपणे १५ हजाराचा खर्च येतो. शहरात २५ ते ३० हजार बालके असून, यातील दीड महिन्याच्या बालकांना मोफत न्यूमोकोकल डोस देण्याकरिता दोन हजार लसी मिळालेल्या आहेत. महापालिकेच्या ३८ आरोग्य केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार लवकरच लसीकरणास सुरुवात होईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.
सहा मृत्यूमध्ये एकाला न्यूमोनियाचा आजार
पाच वर्षाखालील बालकांमध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमाण मोठे आहे. सहा बालकांचा मृत्यू झाला असेल तर त्यातील एका बालकाचा मृत्यू न्यूमोनियाने होतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी न्यूमोकोकल लस मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे पाडळकर यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेची पार्श्वभूमी
कोरोना संसर्गामुळे न्यूमोनियाची लागण होण्याची अधिक शक्यता असते. तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा धोका असेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाकडून ही लस दिली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.