Animal Care : जनावरांना पावसाळ्यात आजारांचा धोका; अशी घ्या पशूंची काळजी

पावसाळ्यात जंतू संसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते, असा सल्ला पशुधन विभागाकडून देण्यात आला आहे.
animal care
animal careSakal
Updated on

देवगाव फाटा : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतू संसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते, असा सल्ला पशुधन विभागाकडून देण्यात आला आहे.

शेतीसाठी बैल आणि दुधासाठी गाय, म्हशी हे पशुधन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच, शेळी-मेंढी पालनसारखे जोडधंदे बळिराजाच्या उत्पन्नात भर घालतात. पावसाळ्यात जनावरे चरण्यासाठी नेत असाल तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात. त्यामुळे गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधींचा वापर, चाऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन करून आपल्या जनावरांची काळजी पशुपालकांनी घेणे गरजेचे आहे. गोठ्यात मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश व हवा कशी येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गोठा पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने धुवून कोरडा ठेवावा. गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बांधून ठेवू नका. गोठ्यातील शेण, मूत्र वारंवार बाजूला करा, पाऊस पडत असताना गोठ्याच्या बाजूला आडोसा करावा, त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येणार नाही. जनावरांना शक्यतो भिजलेला चारा खाऊ घालू नका.

ओले गवत जनावरे कमी वेळेत व अधिक खातात. त्यामुळे जनावरांच्या पोटाचे आरोग्य बिघडून प्रसंगी जनावरांच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे पशुखाद्य किंवा चारा कोरडा ठेवण्यासाठी दक्षता घेतल्यास पशुधन संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध संसर्गजन्य आजार आढळून येतात. हे आजार विविध माध्यमांतून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यासाठी गोठा स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर पशुपालकांनी भर द्यावा. भिजलेला, कुजलेला किंवा बुरशीयुक्त चारा खाऊ घातल्यानेसुद्धा जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे चारा साठविण्याचे नियोजन चोख करावे.

- प्राजक्ता कुलकर्णी,पशुधन विस्तार अधिकारी, सेलू.

जनावरांना पावसाळ्यात होणारे प्रमुख आजार

  • घटसर्प : गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये होणारा संसर्गजन्य रोग

  • सरा : डास, माशा, व इतर कीटकांच्या चाव्यामुळे या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये होतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा, उंटामध्ये आढळतो.

  • बॅबेसिओसिस : एक पेशीय जंतूमुळे होतो व प्रसार पिसके चावल्याने होतो. संकरित जनावरांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.

  • फऱ्या : जनावरांमधील संसर्गजन्य रोग

  • हागवण : हा रोग गायी, म्हशींना जास्त प्रमाणात होतो.

  • पिपअर : शेळ्यांमधील विषाणूजन्य साथीचा रोग

  • थायलेंरिओसिस : हा रोग संकरित जनावरांमध्ये व वासरामध्ये जास्त प्रमाणात आढळतो, पिसवे चावल्याने होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.