नांदेड : मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित पडलेल्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणावरील आंतरराज्य जल प्रकल्पास शासनाने चौथ्यांदा सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता या प्रकल्पावर 2033 कोटी रुपये खर्च करण्यात येणार. येणाऱ्या काही दिवसांत लेंडी धरण पूर्ण होणार आहे. पालकमंत्री पदाची सुत्रे घेतल्यानंतर लेंडी धरणाचा अशोक चव्हाण यांनी त्यांच्या ड्रिम प्रॉजेक्टमध्ये समावेश केला होता. या धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुखेडचे माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनीही सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
लेंडी धरणास तब्बल 33 वर्षांपूर्वी प्रथम मान्यता देण्यात आली होती. त्यावेळेस हा प्रकल्प केवळ 54 कोटींचा होता. या धरणाच्या माध्यमातून 26 हजार 924 हेक्टर जमीन संचिनाखाली येणार आहे. भूसंपादन व इतर कामांसाठी आत्तापर्यंत या प्रकल्पावर 504 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यामध्ये 70 टक्के माती बांधकाम पूर्ण करण्यात आले. दगडी सांडव्याचे काम 75 टक्के पूर्ण, 14 पैकी 10 वक्राकार द्वारे उभारणीसह पूर्ण, कालव्याचे 40 ते 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. या धरणाच्या परिपूर्णतेसाठी 2961 हेक्टर जमीन संपादन करणे आवश्यक असून त्यातील बहुतांश जमीन संपादीत करण्यात आली आहे. केवळ 62.92 हेक्टर जमीन संपादनाचे काम बाकी असून यावर 107 कोटी रुपये निधी गरजेचा आहे.
हेही वाचा - वीज, पर्यावरणाबाबत स्वतंत्र बैठक
लेंडीसह अनेक जलप्रकल्प मार्गी लावण्याचा झपाटा सुरु
या धरणामध्ये बुडीत होणार्या गावामध्ये स्वेच्छा पुर्नवसन प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आला असून त्यास आता शासनाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचे सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी लेंडीसह इतर अनेक जलप्रकल्प मार्गी लावण्याचा झपाटा सुरु केला आहे. या संदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी साततपूर्ण संपर्क करत प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत बैठका घेण्याची विनंती केली होती. नागपूर अधिवेशनाच्यावेळी माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनी लेंडी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे साकडे अशोक चव्हाण यांच्याकडे घातले होते. यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती.
मुक्रमाबाद गावातील पुनर्वसनाचे काम रखडले
या गावातील 1310 घरांचा अंतीम मावेजा प्रलंबित असून एक रकमी अनुदान उपलब्ध होत नसल्यामुळे मागील सात वर्षांपासून गावकर्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. परंतु आता प्रकल्पग्रस्तांनी स्वैच्छा पुनर्वसन योजना मान्य केली आहे व जलसंपदा मंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र 93.24 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
येेथे क्लिक करा - ९४ लाखांचा अपहारप्रकरणी दुय्यम निबंधकास अटक
दोन हजार ३३ कोटीचा खर्च
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच केवळ एका महिन्याच्या आत लेंडी प्रकल्पास त्यांनी मान्यता मिळवून घेतली. आता या प्रकल्पावर 2033 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून आगामी अर्थसंकल्पात यातील काही रक्कमेची तरतूद करण्यात येईल. देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर व मुखेडचे माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले असून या प्रकल्पामुळे मुखेड व देगलूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये हरितक्रांती होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.