‘या’ जिल्ह्यातील क्रीडा संकुल कात टाकणार ! 

 ‘या’ जिल्ह्यातील क्रीडा संकुल कात टाकणार ! 
Updated on

परभणी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडा संकुल व्हिजन व मिशनअंतर्गत आठ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला असून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच क्रीडा संकुल कात टाकणार आहे.

येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांची, प्रशिक्षणाची तसेच अद्यावत ईनडोअर, आऊटडोअर क्रीडांगणाची मोठी वानवा आहे. बहुउद्देशीय सभागृहात केवळ बॅडमिंटन वगळता, अन्य खेळांसाठी सुविधा नाही. जिम्नॅस्टिक हॉल, बॉक्सिंग रिंग वगळता अन्य कुठल्याच खेळासाठी दर्जेदार क्रीडांगण नाही. सर्व खेळांना समावेशक असा ईनडोअर हॉल नसल्यामुळे त्या-त्या खेळांचे कोट्यवधींचे साहित्य कुलूपबंद ठेवल्याशिवाय पर्याय नाही. 

अनेक कामे रखडली
स्क्वॅश हॉलचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. मिनी स्टेडीयमसाठी निधी आला होता, सिटी क्लबची जागा निश्चित झाली होती. काही खर्चदेखील करण्यात आला होता. परंतु, तेदेखील आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कबड्डी, खो-खो या खेळांची मैदानेदेखील नाहीत. तर स्टेडीयम मैदानदेखील केवळ पटांगण झाले असून तेथे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला ४०० मीटर धावनपथ कधी दिसलाच नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या खेळाडूंना येथे फारशा सुविधा नसल्यामुळे राज्य, राष्ट्रीय पातळीवरदेखील अपवादात्मक खेळाडू चमकतात.

आठ कोटींपेक्षा अधिक रकमेचा आराखडा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा संकुलाच्या अद्यावतीकरणासाठी क्रीडा संकुल व्हिजन व मिशनअंतर्गत आठ कोटींपेक्षा अधिक रकमेचा आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर केला आहे. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्री़डा अधिकारी शैलेंद्र गौतम यांनी हा आराखडा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्यापुढे सादर केला. तेव्हा स्पर्धा असल्यास प्रेक्षक गॅलरीचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन या वेळी श्री. पवार यांनी दिले.


 हेही वाचा व पहा....​ अबब..! रस्त्यावर पडले सोन्याचे हजारो मनी...


बॉस्केटबॉल, स्केटिंग मैदान
कार्यालयाच्या मुख्य इमारतीसमोरील स्केटिंग व बॉस्केटबॉल रिंगची जागा या तीन मजली इमारतीसाठी निवडलेली आहे. अन्य जागाच मिळत नसल्यामुळे पर्याय म्हणून या जागेची निवड करण्यात आलेली आहे. या इमारतीच्या तळमजल्यास १८ बाय ३६ मीटरचे बॉस्केटबॉल व २२ बाय २८ मीटरचे स्केटिंग मैदान आहे. पहिल्या मजल्यावर बॉक्सिंग हॉल व जिम्नॅस्टिक हॉल, दुसऱ्या मजल्यावर वेटलिफ्टिंग हॉल व कुस्ती हॉल, तिसऱ्या मजल्यावर टेबलटेनिस हॉल व शुटिंग हॉल या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी सात कोटी २७ लाख ६३ हजार ४०० रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सध्या बचत भवन परिसरात मुलींसाठी दोन वसतिगृह आहेत. त्या इमारतीवर पुन्हा दोन मजले बांधण्याचेदेखील या आराखड्यात निश्चित करण्यात आले असून त्यासाठी ८७ लाख ५१ हजार ९०० रुपये खर्च अपेक्षित आहे. असा आठ कोटी १५ लाख १६ हजार ३०० रुपयांचा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

 

विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर
राज्य शासन राज्यातील क्रीडा संकुलांना पुढील पाच वर्षांत या व्हिजन व मिशनअंतर्गत अद्यावत करणार आहे. त्यासाठी शासनाने प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी ,परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.