पाचोड - परिस्थितीने खचलेल्या परंतु ध्येयवेडे झालेल्या वडजी (ता. पैठण) येथील शेतकऱ्याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर आकाशाला गवसणी घालत पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून चौथी रँक घेऊन पोलिस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळविला. मुलाच्या या यशाने सर्वत्र होणारे कौतुक पाहुन त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थ आनंदाने हरखून गेले आहेत. या गावांतील सर्वप्रथम अधिकारी होण्याचा मान त्याने मिळविला.
वडजी (ता. पैठण) येथील शेतकरी सुभाष उर्फ बाबुतात्या गोजरे यांची परिस्थिती जेमतेम. स्वतःसह पत्नी शेतात काबाडकष्ट करून आपल्या तीन मुले व एका मुलीच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेत मुलांना शिक्षणासह संस्काराचे धडे देत होते. थोरला मुलगा आप्पासाहेब यांने पदवीपर्यंत शिक्षण घेतले, पुढील शिक्षण परिस्थितीमुळे सोडावे लागले.
त्यानंतर आई,वडील व आप्पासाहेब यांनी काही झाले तरी दुसऱ्या क्रमांकाचा मदन व धाकटा प्रदुघ्न, मुलगी रोहीणी यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सरकारी सेवेत नोकरी मिळेपर्यंत न थांबण्याचा निश्चय केला, ते शेतात राबुन हाती आलेली आपली कमाई मुलांच्या 'करियर' वर खर्च करत होते.
कुटुंबिय घामातून मिळविलेला पैसा आपल्या शिक्षणावर खर्च करित असल्याचे पाहून हे तिघेजण अहोरात्र अभ्यास करू लागले व त्यास परिस्थीतीने कितीही मागे खेचले तरी त्यावर मात करीत त्याने जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर खचून न जाता मदन, प्रदुघ्न व रोहीणी यांनी प्रतिसाद दिला. रोहीणी व प्रदुघ्न हे दोघे वैद्यकिय क्षेत्रात अंतिम वर्षात शिकत आहे, त्यांचा डॉक्टर होण्याचा मानस आहे.
मदन याने पोलिस अधिकारी व्हावे ही कुटुंबियाची इच्छा होती,म्हणून त्याने कुटुंबि यासमवेत शेतीत स्वतःलाही झिजविले व मनाशी खुणगाठ बांधली. चौथीपर्यंत वडजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन पाचवी ते अभियांत्रिकी पदवी पर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याची मनोमनी जिद्द बाळगली.
पोलिस खात्याविषयी स्वतःसह कुटुंबियाना आकर्षण असल्याने मदन याने ऑक्टोबर २०२२ मध्ये लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पूर्वपरिक्षा दिली. यांत उतीर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मुख्य परिक्षा उतीर्ण केली. सोळा जुलै २०२४ रोजी मुलाखत पार पडली. मात्र त्याने एवढ्यावर न थांबता त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये तलाठी पदासाठीही परिक्षा दिली होती. त्याचा निकाल मार्च २०२४ मध्ये लागून मदन यांत उतीर्ण झाला.
पोलिस उपनिरीक्षकाच्या नोकरीचे काय होईल सांगता येत नाही म्हणून मिळेल ती नोकरी करण्याची त्याने तयारी दर्शविली. अशातच महसुल विभागाने २५ जुलै रोजी त्याची जळगाव जिल्ह्यात तलाठीपदी नेमणूक केली. मदन तलाठी म्हणून २५ जुलै रोजी सेवेत रुजू होऊन आठ दिवस उलटत नाही तोच, गुरुवारी (ता.एक) लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर होऊन मदन गोजरे हा ३५२ गुण घेऊन राज्यातून खुल्या प्रवर्गातून चौथ्या क्रमांकाने उतीर्ण झाल्याची बातमी झळकली. त्याने आकाशाला घातलेली गवसणी साकार झाली. आता तो तलाठी पदाचा राजीनामा देऊन पोलिस खात्यात रुजू होणार असल्याचे त्याने सांगितले.
जेव्हा गावांत मदन पीएसआय झाल्याचे समजले, तेव्हा गावकऱ्यांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू तराळले. आईवडिलाने केलेल्या कष्टाचे मुलाने चिज केल्याचे त्यांनी सांगितले. गावांत त्याचा जंगी नागरी सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. मदन हा त्याच्या गावांतून पहिलाच अधिकारी झाल्याने सर्वांसाठी तो प्रेरणादायी ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.