हिंगोली जिल्‍ह्यात ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात

photo
photo
Updated on

हिंगोली : जिल्‍ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातवरण राहत आहे. त्‍याचा फटका रब्‍बी हंगामातील पिकांना बसत असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्‍ह्यात एक लाख ३१ हजार ५३ हेक्‍टर क्षेत्रावर रब्‍बीची पेरणी झाली आहे.

बुधवारी सायंकाळी हिंगोली शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांत, तसेच कळमनुरी, औंढा, सेनगाव, वसमत तालुक्‍यातील काही गावांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गुरवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाचे थुवारे होते. जिल्‍ह्यात या वर्षी परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी रब्‍बी हंगामातील पिकांची पेरणी केली.

एक लाख ३१ हजार ५३ हेक्‍टरवर पेरणी

 सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने या वर्षी तब्बल एक लाख ३१ हजार ५३ हेक्‍टरवर रब्‍बीची पेरणी झाली आहे. यात गहू २६ हजार ६२४; तर हरभऱ्याची ९२ हजार ६८४ हेक्‍टरवर पेरणी झाली. इतर क्षेत्रावर मका, तृणधान्य, कडधान्य, तीळ, करडई अन्य पिकांचा समावेश आहे. दरम्‍यान, या वर्षी परतीच्या पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी रब्बी पिकांतून चांगले उत्पादन निघेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. मात्र, जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. 

कीटकनाशकांच्या फवारण्या सुरू 

त्यातच गुरुवारी (ता. २६) ढगाळ हवामानाबरोबरच रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांवर कीडरोग पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हरभरा, गहू, करडई ही पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी कीटकनाशकांच्या फवारण्या करीत आहेत. मात्र, त्यानंतरही कीडरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. कीटकनाशकांची फवारणी करण्याचा खर्चही वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हळद नियंत्रणासाठी योग्य नियोजन करा

वारंगाफाटा: वातावरणात बदल झाला असून दवबिंदू पडत आहेत. त्‍यामुळे हळद पिकावर करपा येण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. अनिल ओळंबे यांनी सांगितले. तसेच प्रा. राजेश भालेराव यांनी सांगितले की, ‘‘सध्या बदलेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍याचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी व आळवणी करावी,१५ ते २० दिवसांनी अमिस्टर किंवा स्प्रिंटची फवारणी करावी, पाणी हलके द्यावे, पूर्ण वाळलेले झाड उपटून जाळल्यास या रोगापासून हरभऱ्याचे पीक वाचू शकते.’’

वातावरण  पिकांसाठी धोकादायक

दोन दिवसांपासून असलेले ढगाळ वातवरण व पडलेल्या हलक्या पावसाच्या सरीमुळे गहू, हरभरा या पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हे वातावरण या पिकांसाठी धोकादायक आहे.
गणेश खंडागळे, शेतकरी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.