परभणी : परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकुळ घातला असून मंगळवारी (ता.१७) रात्री १२ वाजता झालेल्या पावसामुळे गहु, हरबरा आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. १५ दिवसात दुसऱ्यांदा पाऊस पडल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
गतवर्षीपासून पावसाने वेळा बदलल्या आहेत. कधीही ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडू लागला आहे. यंदाच्या वर्षातही जानेवारी महिण्यातदेखील ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर फेब्रुवारी महिण्यात अनेक भागात गारांचा पाऊस झाला होता. आता मार्च महिण्यात सुरवातीला पाऊस झाल्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दोन दिवसांपासून उकाडा वाढला असून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. सोबतीला जोराचे वारेही सुरु होते. तसेच विजांचा कडकडाट उशीरापर्यंत सुरु होता.
हेही वाचा - औंढा नागनाथ मंदिर ३१ मार्चपर्यंत दर्शनांसाठी बंद
सेलू, जिंतूर, पूर्णा तालुक्यात पाऊस
परभणी शहर, ग्रामीण भागात पाऊस सुरु होता. सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळात सर्वाधिक ३० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. अगदी ऑगस्ट-सप्टेंबर महिण्यातील पावसाप्रमाणे हा पाऊस झाला. याच तालुक्यातील देऊळगाव, कुपटा, वालूर भागात चांगला पाऊस झाला. सेलू, जिंतूर, पूर्णा तालुक्यात पाऊस झाला. जिंतुर तालुक्यात रात्री एकच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरु होता. वादळी वारे वाहु लागले होते. काही वेळात पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस सुरु राहीला. जिंतुर शहरासह बामणी, चारठाणा, सावंगी म्हाळसा या भागात पाऊस होता. परभणी तालुक्यातील ग्रामीण, पेडगाव, जांब मंडळात पाऊस झाला.
शेतकऱ्यांची धावपळ
या पावसामुळे सध्या काढणी सुरु असलेल्या गहु, ज्वारी, हरबरा पिकास फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची हरबरा कापनी सुरु असतानाच पावसाने हजेरी लावलल्याने कापनी केलेला हरबरा झाकुन ठेवण्यासाठी रात्री धावपळ झाली. ज्वारी देखील अनेकांनी कापनी केली आहे. मात्र, खुडण्या आधीच पाऊस आला असल्याने ज्वारी काळी पडण्याची भिती आहे. तसेच उशीरा पेरणी केलेली ज्वारी आडवी झाली आहे. गव्हाचे पिक देखील धोक्यात आले.
मंडळनिहाय झालेला पाऊस
परभणी शहर-०२, ग्रामीण-०४, पेडगाव-५.६०, जांब-५.३०, सेलू-०८, देऊळगाव-०३, कुपटा-०४, वालूर-०२, चिकलठाणा-३०, जिंतूर-२, सावंगी म्हाळसा-०४, चारठाणा-०३, बामणी-०५ असा एकुण सरासरी १.५४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
विज पुरवठा खंडीत
मंगळवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातदेखील विज पुरवठा खंडीत झाला होता. परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील अनेक वसाहतीमधील विज पुरवठा रात्री १२ ते दोनच्या दरम्यान, खंडीत झाला होता.
उद्याही पावसाची शक्यता
जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडेल अशी शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती. त्यानुसार मंगळवारी पाऊस झाला आहे. अजुनही पावसाचा धोका असून ता.१९ रोजी पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.