ऑटोरिक्षांचा धुमाकूळ, भिकाऱ्यांचा प्रवाशांना त्रास

file photo
file photo
Updated on

परभणी : एखादी दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा पोचण्यास यंत्रणा दाखल होण्यासाठी किमान रस्ता मोकळे असणे गरजेचे आहे. परंतू, परभणी रेल्वेस्थानकचे मुख्य प्रवेशद्वार ऑटो, भिकारी आणि अवैध विक्रेत्यांनी व्यापले आहे. रेल्वे आल्यास प्रवासी मिळवण्यासाठी ऑटोवाल्यांचा अक्षरशः धुमाकुळ या परिसरात होत असतो. यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यासह महत्वाच्या प्रवाश्यांनादेखील या त्रासाचा दररोजच सामाना करावा लागत आहे.

मागील दहा दिवसापूर्वी घडलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील वेटिंग हॉलच्या आगीच्या घटनेवरून अनेक समस्यांनी स्थानक व्यापले असल्याचे दिसून येते. एरव्ही किरकोळ वाटणाऱ्या समस्या आता गंभीर झाल्या आहेत. तरी, रेल्वे पोलिस, लोहमार्ग पोलिस यांचा त्याकडे कानाडोळा असतो.  अग्निरोधक यंत्रणा स्थानकावर उपलब्ध आहे की नाही?, हे आगीच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. देशभरातील रेल्वेस्थानक वायफायने जोडून कनेक्ट करण्यावर भर दिला जात आहे. तसेच स्वच्छ स्थानक ठेवून त्याची देशात रेटिंग दिली जात आहे. असे असताना परभणी स्थानकावर केवळ शोभेपुरता स्वच्छतेचा डोलारा उभा केला जात आहे. आतुन स्वच्छ तर बाहेरून समस्या अशी गत झाली आहे. जंक्शन असलेल्या परभणी स्थानकावर दिवसभरात ६० रेल्वेची ये-जा असते. कमीत कमी सुविधेत जास्तीत जास्त समस्या असणारे स्थानक, अशी ओळख निर्माण झाली आहे.

महसूल देणारे महत्त्वाचे जंक्शन
परभणी येथून मुदखेड, आदिलाबाद, परळी, लातूर रोड, औरंगाबादकडे जाण्यासाठी रोज ६० रेल्वे उपलब्ध आहेत, परभणी येथून सर्व दिशेला रोज कमीत कमी दोन हजार प्रवासी अप डाऊन करतात. ह्याशिवाय आरक्षण सुद्धा सर्वाधिक होते. महिन्याकाठी ४० लाखाहून अधिक केवळ तिकीट आणि इतर आरक्षण, महिनेवारी पास धरून हे महसुली उत्पन्न दमरे विभागात सर्वाधिक आहे. तरीही स्थानक दर्जा आणि सुविधा मिळत नाहीत ही शोकांतिका आहे.

फलाट दोनवरील स्वच्छतागृह शोभेची वास्तू 
मिरखेल ते परभणी दुहेरीकरण झाल्यामुळे परभणी स्थानकावर असलेल्या फलाट दोन, तीनचा वापर हा औरंगाबाद, लातूर, परळीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेसाठी केला जातो. फलाट एक वर असलेले स्वच्छतागृह सध्या आगीच्या घटनेमुळे बंद आहे, तिथे सध्या डागडुजीचे काम चालू आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रवासी यांना स्थानकावर स्वछतागृह उपलब्ध नाही. फलाट दोनवरील नव्याने बांधलेले स्वछतागृह गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. अशावेळी प्रवाशानी फ्रेश कुठे व्हावे हा प्रश्न आहे.

‘नो पार्किंग’ मधील वाहनावर डोळा
स्थानक परिसर खूप विस्तीर्ण आहे. येथे असलेली वाहन लावण्याची काही जागा भाडेतत्वावर ‘पे पार्क’ ला दिली आहे. स्थानकावर कोणाला सोडायला किंवा घ्यायला आणि आरक्षण काढायला आलेल्या व्यक्तीला पाच ते दहा मिनिटाच्या कामासाठी दहा रुपये पार्किंग भरावी लागते. अन्यथा नो पार्किंग मध्ये उभी केलेली वाहने शहर वाहतूक शाखा येऊन पोलिस मुख्यालयात घेऊन जाते. शहरात विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याऐवजी केवळ दंड लावून शिस्तीचा भडिमार करणारे पोलिस स्थानक परिसरात येऊन आपल्या कर्तव्याचे प्रदर्शन करतात.

किरकोळ विक्रेत्यांना अभय
परभणी स्थानक परिसराला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. एक न्यायालय समोरचे आणि दुसरे बस स्टँडकडे जाणाऱ्या भागात. या दोन ठिकाणी खिचडी, भजे, समोसा असे खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते आहेत. त्यांच्याकडे गॅस, ज्वलनशील साहित्य सहज उपलब्ध आहे. आणि किरकोळ विक्रेते ज्यात पाणी, गुटखा आणि इतर आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखादी गंभीर घटना घडल्यास मग प्राशासन आणि पोलिस जागे होतात, हे नवल आहे.

ऑटोवाल्यांची प्रवासी मिळवण्यासाठी धडपड
ऑटो लावणे आणि काढणे यासाठी वेगळी जागा आखून दिली आहे. त्याठिकाणी ऑटो उभे न करता येईल त्या रेल्वेच्या अगदी प्रवेशद्वार समोर ऑटो लावून वाहतूक कोंडी केली जाते. अनेकदा वेळेवर आलेल्या प्रवाशाला रेल्वेपर्यंत पोचणे कठिण होते. रेल्वे आली की प्रवासी आपल्याच ऑटोत कसा बसेल यासाठी धुमाकूळ घालणारे ऑटो पोलिस का दुर्लक्ष करतात हाही एक प्रश्न आहे.

भिकाऱ्यांकडून होतो नाहक त्रास
प्रत्येक प्रवासी हा काहीतरी कामामुळे गावला जात असतो. वेळकाढण्यासाठी म्हणून कोणी स्थानकांवर फेरफटका मारायला येत नाही. भिकारी मात्र, आलेल्या प्रत्येकाला भीक मागून त्रासून सोडतात. एक तर पैसे द्यावे लागतात किंवा पिच्छा सोडवून घेण्यासाठी जागा बदलावी लागते.  या व्यतिरिक्त देवाच्या नावाने, आजारपण असल्याचे सांगून सतत महिला, लहान मुले भीक मागून त्रास देतात. एक भिकारी तर चक्क मुख्य प्रवेशद्वारसमोर झोपला आहे. जागा आरक्षित केल्याप्रमाणे तिथे ठाण मांडून आहे. विशेष म्हणजे त्या भिकाऱ्याच्या अंगावर किडे, डास, चिलटे, मोकाट जनावर गोंडा घोळत आहेत. अशी घाण पाहून प्रवासाला जायची वेळ परभणीकरावर आली आहे. पोलिसाना हे दिसत नाही बर का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अन्नदान की नासाडी
स्थानक परिसरात रोज रात्री अन्नदान म्हणून एक संस्था चांगल्या भावनेने उपक्रम राबवते. यामुळे गरिबांना एक वेळ जेवण मिळत आहे. मात्र हवशे, गवशे, नवशे इथे येऊन अन्न खातात कमी आणि नास जास्त करतात. ते अन्न तसेच पडून राहते, त्यामुळे परिसर घाण होतो.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.