महापुरुषांच्या दोषांना सुद्धा लोक न्यायालयाने क्षमा केली नाही! एखाद्या महापुरुषाची जयंती-पुण्यतिथी का साजरी करायची? याचे उत्तर म्हणजे 'त्या महापुरुषाच्या जीवन-कार्याचे अवलोकन करून आपल्या जीवनाचे व्यवस्थापन करून आपला मर्यादित संसार आणि भोवताल आनंदी करणे' बस्स! अयोध्येचा आदर्श राजपुत्र, पुरुषोत्तम श्रीरामचंद्र यांची जयंती म्हणजेच रामनवमी आज मोठ्या जल्लोषात संपन्न होत आहे.
रामजन्माचा आनंद सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात, मिरवणुका, ढोलताशे, फटाके फोडून, आकर्षक वेशभूषा करून साजरा होत आहे! परंतु हा उत्सव केवळ आजच्या दिवसापुरता केला जातो आणि रामराज्य निर्माण करणारा आदर्श राजा, गुरुसेवक, अभ्यासू विद्यार्थी, दिनचर्या पाळणारा, आज्ञाधारक पुत्र, प्रेमळ बंधू, एकनिष्ठ पती, निसर्गप्रेमी वनवासी, प्राणीमात्रांचा सखा, भावनिक व्यक्तिमत्व, धनुर्धारी शूर योद्धा, वात्सल्यपूर्ण बाप,
धर्मसहीष्णू महापुरुष ही वैशिष्ट्ये आपण वर्षभर लक्षात ठेवतो का? आपण राजा श्रीरामचंद्र यांच्याकडून काही आदर्श समोर ठेवून आपले जीवन आदर्श करण्याचा प्रयत्न करतो का? आपल्या जीवनाचे व्यवस्थापन करतो का? लोकांनी एक आदर्श पुत्र-पती-भाऊ-राजा देव केला! त्यांना मंदिरात-फोटोत मर्यादित करून आपण खुशाल अमर्याद जीवन जगत आहेत! खरंच, हे मनाला पटते का?
परिस्थिती केंव्हाच आलबेल नसते. प्रत्येक क्षण काहीतरी आव्हाने घेऊनच आलेला असतो. तो इथल्या धीर गंभीर, विचारवंत, ज्ञानी, प्रगल्भ लोकांची परीक्षा पहात असतो. त्यातून हे लोक कसा सकारात्मक मार्ग काढून आपले आणि आपल्या भोवतालच्या लोकांचे जीवन कसे सुखकर करतात(?) याची परीक्षा पहात असतो.
जे परिस्थितीला शरण जातात त्यांची नोंद काळ घेत नाही, आणि जे परिस्थितीवर मात करून आपली ओळख निर्माण करतात त्यांचे नाव मात्र अजरामर राहते. आज सर्वत्र साधनांची रेलचेल आहे. सुख-सोयी-सुविधा भरपूर असून देखील सर्वत्र रोग्यांनी दवाखाने खचाखच भरले आहेत. नाते संबंध सुरळीत नाहीत.
माणसा माणसातील संवाद खुंटला आहे. माणसाचे नैसर्गिक-निरागस-निखळ हास्य लोप पावले आहे. सर्वत्र रंगवलेले-बेगडी चेहरे दिसत असून माणसांच्या चेहऱ्यावरील उत्स्फूर्त झळाळी गायब झाली आहे. स्त्रीयांचे दैवी सौंदर्य घटले आहे. तरुणांचे तारुण्य विरले आहे. तरुणींचे निखळ स्मित, लज्जा, मधुर भाष्य, ईश्वरी सौंदर्य लुप्त झाले आहे. बलदंड, पिळदार, प्रसन्न देहयष्टी असणारी माणसे कुठेच दिसत नाहीत.
सगळीकडे किडकिडीत आणि चिडचिड करणारी माणसं हातात क्षणिक सुख देणारा मोबाईल नावाचा निर्जीव डब्बा घेऊन त्यातच आनंद शोधत आहेत! सगळीकडे मोबाईल वेडेच वेडे! हे मोठे भयंकर चित्र आहे! साधारणत: सर्वच नैसर्गिक बाबी रुक्ष, क्षीण झाल्या आहेत!
सांप्रतकाळी मानवी जीवनात असा विरोधाभास का? याची उतरे पुरुषोत्तम राजा श्रीरामचंद्र यांच्या जीवनात आणि त्यांनी उभे केलेल्या आदर्श रामराज्यात आहेत. अयोध्यापती राजा श्रीरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आज आपण राम नवमी साजरी करतांना अमर्याद जीवन जगण्यामुळे अनंत समस्यांनी ग्रस्त आहोत.
आज मानवी जगण्याला यम-नियमांची नितांत गरज आहे. माणसाने मर्यादा सोडल्याचे परिणाम म्हणजे आज माणसांना अनंत व्याधींनी ग्रासले आहे. नसणारे नवनवे रोग निर्माण झाले ते ही मर्यादा उल्लंघन केल्यामुळेच! एकनिष्ठता, प्रामाणिकपणा, ब्रह्मचर्य इत्यादी बाबींचे उल्लंघन झाले आणि माणूस अवनत झाला. त्यासाठी जीवनात मर्यादा असणे महत्वपूर्ण असून ज्ञानेश्वरीमध्ये
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ ही ओवी लिहून पर्वत, नद्या आणि समुद्र यांनी सुद्धा आपली मर्यादा सोडू नये आणि सोडल्यास भूकंप, त्सुनामी सारखी भयानक संकटे पृथ्वीवर आल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी मर्यादा तत्वाचे काटेकोरपणे पालन करून आनंदी जीवनाचे सुनियोजन करावे.
शिवाय श्री रामचंद्र यांचा कृतज्ञभाव हा अत्यंत महत्वपूर्ण सद्गुण असून त्याद्वारे आज माणसाने आपल्या जीवनात हा सद्गुण अंगी बाळगावा जेणेकरून आपल्याकडून कुणाचाही उपमर्द होणार नाही. निसर्ग, सूर्य, पाणी, हवा, पृथ्वी, आई-वडील, जेष्ठ, गुरुजन आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावर कृपा केली आहे आणि करत आहेत अशा सर्वांच्या प्रती आपण कृतज्ञ भाव जपावा आणि आपले आणि इतरांचे जीवन आनंदी करावे!
राजा श्रीरामचंद्र आपल्या सावत्र आईच्या इच्छेखातर स्वतःचा राज्याभिषेक होण्याच्या वेळेला १४ वर्षांसाठी वनवास पत्करतात यावरून आपल्याला राजा श्रीरामचंद्र यांचा असीम कृतज्ञभाव आणि आज्ञाधारकता लक्षात येते. आज माणूस हा मुळस्वभाव सोडून वर्तन करतोय, परिणामी सर्व सुखसोयी असुनसुद्धा सर्वच माणसे दु:खपूर्ण जीवन जगत आहेत. याचबरोबर आज माणूस संयम हरवून बसला आहे. उतावीळपणा, चिडचिड, घाई-गडबड, तात्काळ फलप्राप्तीसाठी जो तो धावतो आहे, परंतु असे कधीच होत नसते. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण संयमाचे महत्व विषद करतांना अर्जुनाला सांगतात,
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन। कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते।।
म्हणजेच जो मनुष्य आपल्या इंद्रिय, मन, भावना, विचार यांवर नियंत्रण ठेवून आपली दैनंदिन कामे इमानेइतबारे करतो तोच आपले जगणे आनंदी करू शकतो, ताणतणाव मुक्त राहू शकतो. याशिवाय विवेकशील विचार हा श्री रामचंद्रांचा महत्वपूर्ण गुण असून दूरदृष्टीने ते आपल्या समोरील आव्हान, परस्थितीचे अवलोकन करून निर्णय घेतात. यासाठी
तुलसी असमय के सखा , धीरज धर्म विवेक । साहित साहस सत्यव्रत , राम भरोसो एक ॥
अशी ओळ रामायणात लिहून धैर्य, धर्म, विवेक, साहस आणि सत्यवृत्त हे अत्यंत महत्वपूर्ण गुण असून ज्यांनी या सर्वच सद्गुणांची कास धरून जीवन जगतात तेच जीवनात यशस्वी, आनंदी झाल्याशिवाय रहात नाहीत. याशिवाय शांतता प्रीती,
सदाचारी, विद्वतप्रचुरता, ज्ञानी, प्राणी मात्रांवर प्रेम करणे, अन्यायाचा प्रतिकार करणे, शत्रूचा सन्मान करणे, वीर्यवान, धैर्यवान, कुटुंब वत्सल, लोकमताचा सन्मान करणारा राजा आणि १४ वर्ष्यांच्या वनवासानंतर श्री रामचंद्रांनी आपल्या राज्यांत सर्वांना समान संधी, न्याय, सन्मान देऊन आपले आदर्श रामराज्य प्रस्थापित केले. हा आपला आदर्श भूतकाळ आहे.
आज पुरुषोत्तम राजा श्रीरामचंद्र यांची जयंती-रामनवमी साजरी करतांना सर्वच स्थरांवर आपल्याला राजा श्रीरामचंद्राच्या सद्गुणांची नितांत आवश्यकता आहे. संयम, धैर्य, शांती, कुटुंबवत्सलता, कृतज्ञता, कर्तव्यपरायणता, निसर्ग-प्राणीमात्र प्रेम, बंधूप्रेम, त्याग, सामर्थ्य, लोकमतादर, विवेक, प्राज्ञ, दयार्दभाव, मित्रत्व, युद्धकुशल,
नेतृत्व, समयसूचकता, दृढनिश्चय, आत्मभान, यम-नियम, व्यायाम, ध्यान, धारणा इत्यादी महत्वपूर्ण सद्गुण अंगीकारल्यामुळे माणसांच्या जीवनात सर्वकाळ आनंद प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सांप्रतकाळी राजकारणी मंडळींनी श्रीरामनवमी सोहळा आणि राममंदिराबरोबरच देशात रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत. देशामध्ये सहिष्णूता प्रस्थापित करून हा देश सर्व धर्मियांचा असून
आपले पूर्वज आदर्श राजा श्रीरामचंद्र होते हा भाव प्रत्येक नागरिकाच्या मनामनात रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. राजकीय प्रगल्भता प्रस्थापित करून महागाईवर नियंत्रण, तरुणांना नौकऱ्या, शेतमालाला योग्य भाव, स्त्री सन्मान इत्यादी बाबी रुजवून रामराज्य आणावे हीच माफक अपेक्षा! असे होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी करणे होईल अन्यथा आणखी एक मिरवणुक-उत्सव बस्स! जय श्रीराम!
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.