घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक

Latur Corona News
Latur Corona News
Updated on

लातूर  : कोरोना झाला आहे की नाही, याची प्राथमिक पडताळणी करण्यासाठी मेडिकल दुकानातून फिंगर पल्स ऑक्सिमीटर विकत आणून घरातल्या घरात रक्तातील ऑक्सिजन तपासण्याकडे लातुरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. विशेषत: ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून फिंगर पल्स ऑक्सिमीटर घरात ठेवत आहेत. यातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढू लागली आहे, हे दिसून येत आहे.


कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी मेडिकल दुकानांमधून वर्षातून ५ ते १० फिंगर पल्स ऑक्सिमीटरची विक्री व्हायची आणि तीही केवळ डॉक्टरांकडून. पण, कोरोनाच्या काळात डॉक्टरांबरोबरच आता सर्वसामान्य नागरिकांमधूनही फिंगर पल्स ऑक्सिमीटरला मागणी वाढली आहे. याशिवाय वेगवेगळ्या संस्था, कार्यालये, उद्योगधंदे येथेही येणाऱ्या नागरिकांची थर्मल स्क्रीनिंगबरोबरच पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे फिंगर पल्स ऑक्सिमीटरची विक्री वाढली आहे, असे अनुभव औषध दुकानदारांनी ‘सकाळ’ला सांगितले.


औषध वितरक नितीन भराडिया म्हणाले, की पूर्वी कोणीही वारंवार हात पाण्याने धूत नव्हते. पण, आता वारंवार हात धुण्याबरोबरच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे या बाबी वाढल्या आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, असे पदार्थ सेवन केले जात आहेत. या जोडीलाच दक्षता म्हणून पल्स ऑक्सिमीटर घरात आणून त्याद्वारे तपासणी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. याचा अर्थ नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक बनत आहेत, असे दिसून येत आहे. ‘वारद मेडिकल’चे दीपक वारद यांनीही असाच अनुभव सांगितला. ते म्हणाले, की ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून पल्स ऑक्सिमीटरची विचारपूस करीत आहेत. मशीन घेऊन त्याद्वारे घरीच तपासणी करीत आहेत. याआधी काही डॉक्टरांनाही पल्स ऑक्सिमीटरची आवश्यकता नव्हती. पण, कोरोनामुळे आता इतर डॉक्टरही हे मशीन वापरू लागले आहेत.

...याकडे द्या लक्ष
कोरोना आहे की नाही, याचा प्राथमिक अंदाज पल्स ऑक्सिमीटर मशीनद्वारे घरच्या घरी लावता येतो. तपासणी करताना रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल ९२ टक्क्यांपेक्षा जास्त दाखवत असेल तर कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ९२ किंवा ९० पेक्षा कमी असेल तर श्वसनाचा त्रास आहे, हे अधोरेखित होते. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना किंवा आजारी व्यक्तींना श्वसनाचा त्रास होतो. काही कोरोनाबाधितांना निमोनियाही होतो. हे लवकर समजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. हे मशीन एक हजार २०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.