Parbhani Loksabha Constituency : शक्तिप्रदर्शनाने संजय जाधवांचा अर्ज ; परभणीमध्ये मिरवणूक, महाविकास आघाडीतर्फे सभाही

लोकसभेच्या परभणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मंगळवारी मोठे शक्तिप्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवार बाजार परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. महाविकास आघाडीची प्रचारसभा झाली.
Parbhani Loksabha Constituency
Parbhani Loksabha Constituency sakal
Updated on

परभणी : लोकसभेच्या परभणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मंगळवारी मोठे शक्तिप्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवार बाजार परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. महाविकास आघाडीची प्रचारसभा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, राजेश राठोड, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार मीराताई रेंगे पाटील, सीताराम घनदाट, अॅड. विजय गव्हाणे, सुरेश देशमुख, विजय भांबळे व सुरेश जेथलिया आदी उपस्थित होते.

अंबादास दानवे यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘अनेकदा धोका देऊनही महादेव जानकर हे भाजपकडे कसे काय गेले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीची जागा सुरक्षित करायची होती. त्यामुळे जानकरांना परभणीची उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून उमेदवारांना बकरा बनविण्याचे काम सुरू आहे. चारशेपार खासदार संसदेत नेऊन भाजपला राज्यघटना बदलायची आहे. हे पाप आम्ही होऊ देणार नाहीत. महायुतीत येण्याआधी अजित पवार भाजपवर कडाडून टीका करत होते. आता ते भाजपची सर्वाधिक स्तुती करीत आहेत. अजित पवार यांनी बारामतीची जागा निवडून येते का ते पहावे’.

देशात हुकूमशाही ; राजेश टोपे

देशात हुकूमशाही आली आहे. भाजप सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या विळख्यात लोटत असल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला. राज्यातील सामाजिक आरोग्य बिघडविण्याचे काम महायुती सरकार करत आहे. मतांवर डोळा ठेवून भाजपने जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ प्रतिक्रिया देऊ नका तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना प्रतिसाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.

‘ठाकरेंच्या नावावरच तरलो, हे दाखवून देऊ’

आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आतापर्यंत तरलो आहोत, हे या निवडणुकीतून दाखवून देऊ, असे संजय जाधव यानी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सत्तारूढ पक्षावर टीका केली. ‘या मतदारसंघात मतदारांनी शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर सातत्याने प्रेम केले आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचंड मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीतसुद्धा असेत प्रेम व्यक्त करतील. निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह नाही, याची खंत आहे. परंतु, मशाल हे चिन्हसुध्दा शिवसेनेस नवे नाही. छत्रपती संभाजीनगरातून मोरेश्‍वर सावे हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार हे मशाल या चिन्हावरच निवडून आले होते’, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. त्यानंतर मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.