उस तोडला, गटारं उपसली, लोकांनी हाकललं पण आज अनेक 'अनाथांचा नाथ'

एके दिवशी राहत्या घरातून काहीच कारण नसताना मालकाने अनाथ मुलांसहित घराबाहेर काढलं, बाहेर धोधो पाऊस सुरू होता अन्...
Santosh Garje
Santosh GarjeSakal
Updated on

घरात कमालीची गरिबी, आईवडील उसतोड कामगार अन् या गरिबीमुळे स्वत:लाही काही काळ तोडावा लागलेला उस. बहिणीच्या नवऱ्याने तिच्या गरोदरपणात पोटात लाथ घालून तिला मारलं, तिची लहान मुलगी संभाळायची जबाबदारी आली अन् याच चिमुकलीच्या चेहऱ्याकडे पाहून उदयास आलेला 'सहारा अनाथालय बालग्राम परिवार.' पावसाळ्यात मुलांना घेऊन मंदिरात झोपण्यापासून ते लेकरांना खाण्यासाठी लोकांकडे हात पसरवण्यापर्यंतचा संघर्ष... आज या बालग्रमात १५० पेक्षा जास्त मुलं आनंदाने राहतायेत. ही कहाणी आहे उसतोड कामगाराचा मुलगा संतोष गर्जे यांच्या संघर्षाची...

कहाणीला सुरूवात होते ती दुष्काळी बीडमधील आष्टी तालुक्यातील पाटसारा येथून. संतोष यांच्यासहित सहा भावंडं आणि आईवडील असे मिळून आठ जणांचा परिवार. या भावंडांच्या शिक्षणाची भ्रांत. पाटी आहे तर पेन्सील नाही, कपडे नाही, दप्तर तर दूरच. आईवडील सहा महिने उसतोडीसाठी जायचे अन् आल्यावर बाकीची शेतीची कामं व्हायचे. पण असं संघर्षाचं जीवनही नियतीला कधीकधी मान्य नसतं. संतोष यांच्या एका गरोदर बहिणीच्या पोटात तिच्या नवऱ्याने लाथ घातल्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला होता. हे ऐकून पायाखालची जमीन सरकली पण खचून चालणार नव्हतं. तिला एक लहान मुलगी होती. साहजिकच तिला सांभाळायची जबाबदारी घ्यावी लागली.

सहारा अनाथालय, बालग्रमामधील मुले
सहारा अनाथालय, बालग्रमामधील मुलेSakal

कधीकधी नियतीला एखाद्याचं फाटकं आयुष्यसुद्धा बघवत नाही तिला समोरच्याला उध्वस्तच करायचं असतं. बहिण गेली हे दु:ख एकीकडेच पण लेकीच्या मरण्याला कारणीभूत आपणच असल्याच्या दु:खातून वडिलांनीसुद्धा घर सोडलं. होता नव्हता आधार सुद्धा नाहीसा झाला होता. अशा सगळ्या परिस्थितीत संतोष यांच्यावर घराची सगळी जबाबदारी आली. पण बहिणीची लहान मुलगी जगण्याला नवी प्रेरणा देत राहिली.

या अशा परिस्थिती संतोष यांनी गाव सोडलं. छत्रपती संभाजीनगर गाठलं अन् हाताला मिळेल ते काम करू लागले. एकदा असंच काम सुरू असताना अचानक एक विचार मनात आला अन् लहान अनाथ मुलांसाठी काम करायचं त्यांनी ठरवलं. आहे तसं छत्रपती संभाजीनगर सोडलं अन् बीड जिल्ह्यातला गेवराई तालुका गाठला. या ठिकाणी त्यांना जेवढ्या अडचणी आल्या तेवढेच जीव देणारे मित्रही मिळाले. अनाथाश्रम सुरू केलं. खिशात असलेल्या पैशांकडून काही सामान खरेदी केलं अन् सुरू झाला प्रवास...

सहारा अनाथालय, बालग्रमामधील मुले
सहारा अनाथालय, बालग्रमामधील मुलेSakal

अनाथ मुलांच्या शोधात असताना ज्यावेळी संतोष गावोगावी फिरायचे त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर संशय घ्यायला सुरूवात केली. पण संघर्ष आणि प्रयत्नापुढे नियतीला हार ही मानावीच लागते. अशा सगळ्या परिस्थितीतही बालग्राम सुरू झालं. खरेदी केलेला माल संपला तेव्हा परत लोकांकडे हात पसरून मदत मागायचं ठरवलं. अनेक अडचणी आल्या, कुणी मदत केली तर कुणी हाकलून लावलं. पण या अनाथ लेकरांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी संतोष यांचा संघर्ष थांबला नव्हता.

साल होतं २०११. एके दिवशी राहत्या घरातून काहीच कारण नसताना संतोष यांच्यासहित अनाथ मुलांना घरमालकाने बाहेर काढलं. पावसाळ्याचे दिवस होते. काहीच पर्याय उरला नव्हता. लेकरं भिजत होती. अनेकांनी आश्रय मागितला पण कुणी मदत केली नाही. यावेळी जिवलग मित्रांनी मदतीचा हात पुढे केला आणि गेवराई येथून तीन किलोमीटर अंतरावर तीन एकर जमीन मिळवून दिली. यानंतर कामाचा व्याप वाढला. अनाथ मुलांची आवक हळूहळू वाढत होती.

संतोष गर्जे एका कार्यक्रमात बोलताना
संतोष गर्जे एका कार्यक्रमात बोलतानासकाळ

हे कुठेतरी व्यवस्थित सुरू असताना मूळ गावातील समाजाने यांना नावं ठेवण्यास सुरूवात केली होती. पण संतोष यांनी जिद्द सोडली नाही. एकदा यवतमाळ येथील एका कार्यक्रमात त्यांना एका कायद्याचा अभ्यास करणाऱ्या मुलीशी ओळख झाली. तिच्यामध्ये तिला आपल्या आयुष्याची जोडीदार मिळाली. २२ मुलींनी नाकारल्यानंतर संतोष यांना ही व्यक्ती मिळाली होती. २०११ मध्ये संतोष आणि प्रीती त्यांनी विवाह केला. प्रीती यांनीसुद्धा संतोष यांच्या कामात मोठा वाटा उचलला त्यामुळे आज सहारा बालग्राम अनाथालय तोऱ्यात उभं आहे. या अनाथालयात आज १५० पेक्षा जास्त मुलं आहेत.

उसतोडी, गरिबीच्या या संघर्षातूनही संतोष यांनी हा बालग्राम परिवार उभा केला. या सगळ्या खटाटोपासाठी कारणीभूत होती ती बहिणीची लहानही चिमुकली. संतोष यांच्या अनाथाश्रमात वाढलेल्या काही मुलींची लग्न झाले. पण तरीही समाजात असलेल्या अनेक अनाथ लेकरांना चांगलं आयुष्य देण्यासाठी संतोष यांची धडपड आजही चालूच आहे. या अनाथाश्रमाला आपण एकदातरी अवश्य भेट द्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.