शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात भरविली शाळा

photo
photo
Updated on

कळमनुरी(जि. हिंगोली): मागील चार महिन्यांपासून निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना तातडीने शाळेवर रुजू करावे, या मागणीसाठी मोरवड येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. २९) गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात शाळा भरविली. तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांची भेट घेत आपली मागणी पूर्ण करून घेतली.

तहसील प्रशासनाने काही शिक्षकांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागात प्रतिनियुक्त्या करून घेतल्या होत्या. निवडणूक झाल्यानंतर काही शिक्षकांना शाळेवर परत पाठविण्यात आले. मात्र, पदवीधर मतदार नोंदणी कामाकरिता मोरवडच्या दोन शिक्षकांना तहसील कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोठा कालावधी उलटल्यानंतरही हे शिक्षक शाळेवर परत आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे.

शिक्षकांची मागणी लावून धरली

या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या तालुक्यातील मोरवड येथील शाळेतील इयत्ता पाचवीचे विद्यार्थी व पालक केशवराव गलांडे, आप्पाराव दुधाळकर, कोंडबा बेले, कुंडलिक बेले, रामेश्वर गलांडे, शिवाजी बुरकुले, कुंडलिक दळवे, प्रकाश डवले, प्रभू बेले, दिलीप गलांडे, माधव बेले, मोतीराम ढाकरे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुरवडे यांनी बुधवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी लावून धरली. 

शिक्षकांना शाळेवर पाठविण्याचे आदेश

मात्र, ही बाब आपल्या अधिकारात नसून या संदर्भात आपण तहसीलदारांशी बोलू, असे गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी सांगताच संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे दालन गाठले. त्यांना शैक्षणिक नुकसानीची माहिती दिली. विद्यार्थी व पालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार श्री. वाघमारे यांनी तातडीने निवडणूक कामासाठी तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या दोन्ही शिक्षकांना शाळेवर पाठविण्याचे आदेश दिले.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान

मोरवड येथील शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. दोन महिने झाले तरी या शिक्षकांना शाळेवर पाठविण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता दोन्ही शिक्षकांना पुन्हा शाळेवर पाठविले जाणार असले तरी दोन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांना पेलावे लागणार आहे.

शिक्षकांची अनेक पदे रिक्त

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदांचा आकडा वाढतच आहे. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अगोदरच रिक्त पदे असताना निवडणूक संपल्यानंतरही शिक्षकांना शाळेवर पाठविले जात नाही. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.