बीजोत्पादनातून मिळते दुप्पट उत्पन्न

03-02-2020.jpg
03-02-2020.jpg
Updated on

नांदेड : बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संशोधन केंद्रात उत्पादित होणारे भाजीपाल्याचे बिजोत्पादन शेतकरी आपल्या शेतीवर घेऊन शाश्वत पद्धतीने दुप्पट उत्पन्न घेत आहेत. कंधार तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेले लहान शेतकरी एकत्र येऊन प्रक्रिया केंद्राची स्थापनाही केली आहे. यातील लाठ खुर्द येथील दत्तात्रय घोरबांड यांनी बिजोत्पादाचा यशस्वी प्रयोग करून दहा गुंठ्यांत खर्च वजा जाता एक लाखाचे उत्पन्न मिळवित आहेत.

दरवर्षी ६० ते ८० लाखांचे उत्पादन

कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून कंधार तालुक्यातील लाठ खुर्द, उस्माननगर, कंधारेवाडी, गऊळ, रहाटी आदी गावांतील कमी शेती असलेले शेतकरी भाजीपाला बिजोत्पादनाकडे वळले आहेत. या गावात एकूण १५ पक्के, तर दहा लाकडी खांबांचा आधार देऊन शेटनेटची उभारणी शेतकऱ्यांनी केली आहे. यातून टोमॅटो, मिरची, शिमला मिरची, कारले, काकडी आदी भाजीपाल्यांचे अतिशय किचकट काम कुशल पद्धतीने करण्यात शेतकऱ्यांनी हातखंडा निर्माण केला आहे. यातून शेतकरी दरवर्षी ६० ते ८० लाखांचे उत्पादन घेत आहेत. शेडनेटमधून उत्पादित झालेले पिकांचे बियाणे वेगळे करून ते वाळविण्यासह इतर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी पोखरभोसी येथे प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे.

दहा गुंठ्यांचे बिजोत्पादन वीस गुंठ्यांपर्यंत वाढविले
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती, दरवर्षी कमी-अधिक होणारे पर्जन्यमान यामुळे शाश्वत उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना मिळत नाही. ही बाब कंधार तालुक्यातील लाठ खुर्द येथील दत्तात्रय संभाजी घोरबांड यांनी हेरली. पहिल्या वर्षी दहा गुंठ्यांत बिजोत्पादन घेऊन ते यशस्वी केले. मागील दोन वर्षांपासून त्यांनी भाजीपाला बिजोत्पादन घेत आहेत. कोरडवाहू शेती असल्यामुळे घोरबांड यांनी शेतीच्या वरच्या बाजूला शेततळे घेतले. यामुळे विजेशिवाय त्यांच्या भाजीपाला बिजोत्पादनासह चार एकरला पाण्याची सोय झाली आहे. शेततळ्यात चाळीस लाख लिटर पाण्याची उपलब्धता झाल्याने त्यांच्या कामाचा उत्साह वाढला. पूर्वीच्या दोन शेडनेटसह त्यांनी नव्याने तीन शेडनेटची उभारणी केली आहे. यातून घोरबांड यांना खर्च वजा जाता दरवर्षी एक लाखाचे उत्पादन मिळवित आहेत.

बिजोत्पादनाचा ताळेबंद
दत्तात्रय घोरबांड यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला बिजोत्पादन पिकांच्या कालावधीनुसार वर्षभरात एक किंवा दोन पिकांचे उत्पादन घेतात. मिरचीचे हंगामात एक पीक घेतले जाते. मिरचीचा काढणीपर्यंत आठ महिन्यांचा कालावधी असतो. या पिकांचा संकरणीकरणाचे काम तीस ते चाळीस दिवसांत पूर्ण होतो. यातून २५ ते २८ किलो बियाणे मिळते. प्रतिकिलो साडेनऊ हजार ते साडेदहा हजार रुपये किलो प्रमाणे दर कंपनीकडून मिळतात, असे ते सांगतात. काकडीच्या बिजोत्पादनासाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो. यापासून तीस ते पस्तीस किलो बियाणे मिळते. काकडी बियाणांचा दर अडीच ते तीन हजार मिळतो. टोमॅटोच्या बिजोत्पादनासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. यातून २५ ते २८ किलो बियाणे मिळते. याला जातनिहाय साडेआठ ते साडेदहा हजार रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. कारल्याचे बिजोत्पादन साडेतीन महिन्यांचे आहे. यातून ३५ ते ४० किलो बियाणे मिळते. याला अकराशे रुपये किलो प्रमाणे दर मिळतो. याबरोबच ढोबळी मिरचीचेही उत्पादन घेतले जाते.

विभागीय आयुक्तांनी केली पाहणी
कोरडवाहू तसेच लहान शेतकऱ्यांनी केलेल्या बिजोत्पादन क्षेत्राला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ता. २३ जानेवारी रोजी भेट दिली. या वेळी तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी बिजोत्पादनाबद्दल माहिती दिली. श्री. केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतूक केले.

कोरडवाहू तसेच कमी क्षेत्र असलेले शेतकरी बिजोत्पादनातून हमखास उत्पादन घेत आहेत. यातून त्यांना दुप्पट उत्पन्न मिळविता येईल. इतर शेतकऱ्यांना याकडे वळावे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.
अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी.

भाजीपाला बिजोत्पादनातून शेतकऱ्यांनी सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेचा प्राधान्याने लाभ देऊन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी बिजोत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित झाले. यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा मार्ग सापडला आहे.
रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी, कंधार

भाजीपाला बिजोत्पादनामुळे आमचे शेतीमधील उत्पादन चांगले येत आहे. दहा गुंठ्यांतील खर्च वजा जाता वर्षाला एक लाख रुपये शिल्लक राहतात. सध्या तीस गुंठ्यांत बिजोत्पादन सुरू केले आहे.
दत्तात्रय घोरबांड, शेतकरी लाठ खुर्द, ता. कंधार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.