घनसावंगीचा शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ

डॉ. हिकमत उढाण यांची भूमिका ठरतेय महत्त्वाची, शिवसेनेच्या गट-तटापासून सारेच दूर
shiv sena
shiv sena
Updated on

घनसावंगी - राज्यभरात शिवसेनेमध्ये सध्या गटबाजी जोरात सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ठिकठिकाणचे आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे मात्र घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे यात शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.

भौगोलिकदृष्टया जालना जिल्ह्यात असला तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा परभणी लोकसभा क्षेत्रात समावेश होता. परभणी लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे . अर्थात राज्यात मागील गेल्या दोन आठवड्यापासून शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरही खळबळ उडत आहे. जालना जिल्ह्याबरोबर परभणी लोकसभेतील लोकप्रतिनिधी, माजी आमदार, माजी मंत्री अजूनही गट-तटांपासून दूर आहेत.

प्रत्येकजण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभा आहे. हेच चित्र घनसावंगी मतदारसंघात आहे. पूर्वीच्या अंबड मतदारसंघातून १९९५ च्या युतीच्या काळात आमदारपदी शिवाजीराव चोथे विजयी झाले, तेव्हापासून या मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. अर्थात गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचा मतदारसंघात राजकीय दबदबा आहे. टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्यासमोर नेहमीच शिवसेनेचे आव्हान राहिलेले आहे. विधानसभेत यश जरी मिळाले नसले तरी शिवसेनेने प्रबळ विरोधी पक्ष म्हणून येथे काम केले आहे.

येथील शिवसैनिकांना आपले प्रश्‍न मांडण्यासाठी ना कार्यालय होते, ना स्थानिक निवडणुकीत शिवसैनिकांना ताकद दिली जात होती. मात्र हे चित्र बदलले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांनी. मागील दहा वर्षापासून डॉ.उढाण यांनी या मतदारसंघावर लक्ष घालून आपली पकड मजबूत केली. येथे त्यांनी प्रशस्त संपर्क कार्यालय बांधले, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायती यासह अन्य निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवले.

मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. हिकमत उढाण यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली, त्यांचा विजय अवघ्या सतराशे मतांनी हुकला, मात्र त्यांनी आतापर्यंत पुन्हा नव्या जोमाने कार्य सुरू ठेवले. या भागातील शिवसैनिकांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील कारखानदारीचे महत्व तसेच अतिरिक्त उसाचा प्रश्‍न लक्षात घेता गूळपावडर व इथेनॉल निर्मितीचा प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

मागील काळात राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगावर येथील शिवसैनिकातही प्रतिक्रिया उमटत होत्या, मात्र पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम मानला. शिवसैनिकांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देण्यात आल्या नाहीत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला विरोध करणारा, तसेच विरोधात निवडणूक लढविल्यानंतर हातमिळवणी नको असा सूर लावणारा शिवसैनिकाचा मोठा वर्ग येथे आहे, मात्र राज्यातील शिवसेनेत झालेली बंडखोरीचा मात्र येथे काही परिणाम दिसून आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेच्या रूपाने डॉ. हिकमत उढाण यांच्या माध्यमातून शह दिला जात असल्याची जाणीव शिवसैनिकांना आहे, शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व डॉ.उढाण यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे या भागातील शिवसैनिक हा पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे चित्र तूर्त तरी दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.