उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा !

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्हा परिषदेचे नवे कारभारी मंगळवारी (ता. सात) ठरणार आहेत. त्यासाठी सोमवारी (ता. सहा) दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकांनी जोर मारला. उपाध्यक्षपदांसह काही मलाईदार सभापतीपदावरून सुरू झालेली चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे मंगळवारी मोठ्या घडामोडी घडणार याची खात्री झाली आहे. दरम्यान, शिवसेनेने उपाध्यक्ष पदावर दावा केला असून शिवसेनेकडून अंजली आनेराव यांचे नाव पुढे आले आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची निवड मंगळवारी होणार आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. ज्या प्रमाणे राज्यात सत्ता स्थापनेपासून ते खातेवाटपापर्यंत गोंधळ सुरू होता. त्याच धर्तीवर परभणीत राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत उकाळ्या-पाकाळ्या समोर येत आहेत. सुरवातीला अध्यक्षपदावरून सुरू झालेला पाथरी विरुद्ध जिंतूर मतदारसंघाचा वाद रविवारी थांबताच आता उपाध्यक्षापदांसह समाज कल्याण, बांधकाम या विषय समित्यांवरून वाद सुरू झाला आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यात मॅराथॉन बैठक होऊनही रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नसल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. दुपारी अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाल्यानंतर आमदार दुर्राणी यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात सायंकाळी बैठक पार पडली. मात्र, त्याही बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
या सर्व घडामोडीत शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याची चर्चा समोर आल्यानंतर शिवसेनेतदेखील या पदावरून गोंधळ सुरू झाला आहे. 

अंजली आनेराव यांचे नाव चर्चेत
१३ पैकी पाचहून अधिक सदस्यांनी उपाध्यक्षपदासाठी आपले नाव पुढे केल्याने शिवसेनेतदेखील पेच निर्माण झाला आहे. त्यात पाथरी तालुक्यातील एका सदस्याने उपाध्यक्षपदासाठी सोमवारी तयारीनिशी जिल्हा परिषदेत येत या पदावर दावा केल्याने गोंधळात आणखी भर पडली. दरम्यान, आमदार डॉ. राहुल पाटील समर्थक सदस्या अंजली आनेराव यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. रात्री उशिरापर्यंत शिवसेनेकडून अंजली आनेराव यांचे नाव चर्चेत होते. तर दुसरीकडे जिंतूर मतदारसंघातील सदस्य उपाध्यक्षपदांसह अन्य दोन सभापतिपद सोडायला तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मंगळवारी मोठ्या घडामोडी घडणार, हे निश्चित.

सदस्यांत अस्वस्थता
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने एक एक बाब घडत आहे. या आघाडीत सदस्य मात्र अस्वस्थ झाले आहेत. कोणाला काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जे इच्छुक आहेत त्यांनी आपआपल्या परीने आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेत सर्वच पक्षांचे सदस्य एकमेकांच्या कानात कानमंत्र देत होते. अनेकांच्या चेहऱ्यावर एकप्रकारची नाराजी दिसून आली.


सकाळी ११ वाजता प्रक्रिया सुरू होणार
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे या उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर निवडप्रक्रिया होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.