मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धोपटेश्वर येथे जलकुंभावर चढून २० ते २५ तरुणांचे पाच तास शोले स्टाईल आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले
sholay style protest of 20 to 25 youth at Dhopteshwar to demand Maratha reservation
sholay style protest of 20 to 25 youth at Dhopteshwar to demand Maratha reservationSakal
Updated on

बदनापूर (जिल्हा जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी बदनापूर तालुक्यात मराठा समाज आक्रमक होत आहे. दरम्यान, धोपटेश्वर (ता. बदनापूर) येथे रविवारी (ता. २९) मराठा तरुणांनी थेट गावातील पाणीपुरवठ्याच्या जलकुंभावर चढून "एक मराठा - लाख मराठा" तसेच "आरक्षण आमच्या हक्काचे" अशा घोषणा देत तब्बल वीस ते पंचवीस जणांनी पाच तास शोले स्टाईल आंदोलन केले.

शिवाय खाली थांबलेल्या मराठा तरुणांनी धोपटेश्वर - बदनापूर मार्गावर टायर जाळून तासभर रास्ता - रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. जलकुंभावर चढून आंदोलन करणाऱ्या तरुणांना खाली येण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले.

मात्र तरुणांनी आक्रमक भूमिका घेत सुमारे पाच तास आरक्षणाच्या मागणीसह सरकार विरोधी घोषणाबाजी करीत आंदोलन सुरूच ठेवले. शेवटी मराठा मोर्चाचे समन्वयक राजेश जऱ्हाड, नंदकिशोर दाभाडे, नंदकिशोर शेळके, राम सिरसाठ, राधाकिसन शिंदे, संतोष वरकड, सिद्धेश शेळके आदींसह बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत, फौजदार निवृत्ती शेळके यांनी आंदोलक तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो पर्यंत खाली थांबलेल्या तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता - रोको आंदोलन सुरू केले. यावेळी जलकुंभावरून आणि रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या तरूणांनी दिलेल्या घोषणांनी धोपटेश्वर रस्ता आणि गाव अक्षरशः दणाणून गेले होते.

यावेळी धोपटेश्वर येथील संतोष दाभाडे, नारायण दाभाडे, अमोल दाभाडे, अरुण दाभाडे, सहदेव कोल्हे, हरी तिडके, अर्जुन शेळके, उमेश दसपुते, मनीष शेळके, नानासाहेब दाभाडे, पवन शेरे, रोहित कोल्हे, योगेश दाभाडे आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

धोपटेश्वर येथे ठिय्या आंदोलनाचा आज ५१ वा दिवस

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पहिल्यांदा उपोषणाला बसले होते. तेव्हा पासून धोपटेश्वर येथे बदनापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा रविवारी (ता. २९) ५१ वा दिवस होता. या ठिय्या आंदोलनात दररोज विविध गावातील मराठा समाज बांधव सहभागी होतात.

शिवाय रात्री भजन - कीर्तन, जागरण, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात. पहिल्या उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना सुट्टी झाल्यानंतर त्यांनी थेट रुग्णवाहिकेतून येत धोपटेश्वर गावाला पहिली भेट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.