Beed : झेडपीचे सहा विभाग हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत; कर्मचारी त्रस्त, नागरिकांना दूर अंतरावर खेटे मारण्याची वेळ

जिल्हा परिषदेची टोलेजंग तीन मजली इमारत उभारली असली तरी काही विभागांना जागा अपुरी असल्याने ‘परघरी सत्यनारायण’ सुरुच आहे. अद्यापही जिल्हा परिषदेचे मुख्य सहा विभाग इतर विभागांच्या कार्यालयातच आहे.
Beed  zilla parishad
Beed zilla parishadSakal
Updated on

Beed News : जिल्हा परिषदेची टोलेजंग तीन मजली इमारत उभारली असली तरी काही विभागांना जागा अपुरी असल्याने ‘परघरी सत्यनारायण’ सुरुच आहे. अद्यापही जिल्हा परिषदेचे मुख्य सहा विभाग इतर विभागांच्या कार्यालयातच आहे.

आता मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांना ‘हायसे’ वाटत असले तरी जिल्हा परिषदेच्या कामासाठी येणाऱ्यांना मात्र इकडून तिकडे चकरा माराव्या लागतात. दोन मजल्यांच्या बांधकामासाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी चार वर्षांपासून धुळखात पडून आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुष आणि लोकनेत्यांच्या पुतळे उभारणीच्या मुद्द्याकडेही नेत्यांनी कानाडोळा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील १९६० साली बांधलेल्या जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाल्याने तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने ३७ कोटी रुपये खर्च करुन तळमजला (वाहनतळ) आणि इतर तीन मजल्यांचे बांधकाम करण्यात आले.

दोन वर्षांपासून या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह बांधकाम विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वित्त विभाग आदी कार्यालये या ठिकाणी आली.

मात्र, आजही महत्वाचा असलेला आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण विभाग (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (योजना) आदी विभाग इतरत्रच आहेत. मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने काही विभागांतील कर्मचाऱ्यांना ‘हायसे’ वाटते.

मात्र, आरेाग्य, समाज कल्याण अशा सामान्यांशी निगडीत विभाग दूर असल्याने महत्वाच्या कामांसाठी अधिकारी - कर्मचाऱ्यांना तसेच लाभार्थींना इकडून तिकडे खेटे मारावे लागतात. त्यमुळे हा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे.

महापुरुष, लोकनेत्यांच्या पुतळ्यांबााबतही कानाडोळा

जिल्हा परिषदेसमोर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महत्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांसह जिल्ह्यातील लोकनेत्यांचे पुतळे उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

येथील सामाजिक संघटनांनी याबाबत उपोषण केले होते. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर अगोदर पुतळे उभारल्यानंतरच इमारतीत प्रशासकीय कारभार सुरु करावा, अशी भूमिका घेतली होती.

यावर जिल्हा परिषदेच्या तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी लवकरच पुतळे उभारणीचे आश्‍वासन दिले होते. आता जिल्हा परिषदेवर प्रशासक असले तरी राज्य शासनात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मात्र, पुतळ्यांच्या उभारणीकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.

पुतळ्यांसाठी जिल्हा परिषद स्वायत्त निधीतून ५० लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर, इमारतीच्या दोन मजल्यांच्या उभारणीचा प्रस्ताव शासनाला पाठविलेला आहे. याबाबत पाठपुरावाही सुरु आहे.

— वसुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.