हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा चालू हंगामातील खरीपाचा पीकविमा तात्काळ मंजूर आणि वाटप करण्यात येवून आठवडाभरात पीकविमा कंपनीचे कार्यालय तालुका स्तरावर सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने कारवाई करू असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी देऊन पीकविमा कंपनीच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.
परतीच्या मान्सूनमुळे संपूर्ण जिल्हाभरात अतिवृष्टी ,ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचे आणि खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे . या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्याचा झंझावाती दौरा करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. सुरवातीच्या पावसाने शेतकऱ्याला तारले परंतु परतीच्या पावसाने काढणीला आलेले मूग ,उडीद, सोयाबीन हे नगदी खरीप पीक हिरावून घेतले. यामुळे मतदार संघातील शेतकरी हवालदिल झाला असून, सरकारी मदतीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . सरकार एकीकडे शेतकऱ्यांना भरीव मदत देत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकविम्याची सर्व पूर्तता वेळेत पूर्ण करून सुद्धा पीकविमा कंपन्या मात्र विमा देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे अस्मानी संकटांनी भरडून निघालेला शेतकरी पीकविमा कंपनीच्या दंडेलशाही मुळे हतबल झाला आहे.
जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले
डोंगरकडा भागात केळी फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याभागात कंपनीने तापमानाचे कारण पुढे करत पीकविमा नाकारला आहे .या आणि इतर तक्रारींचा ओघ जिल्हाभरातून खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आल्यांनतर तात्काळ यावर कारवाई करत खासदार हेमंत पाटील यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि सोबतच जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व चालू हंगामातील पीकविमा तात्काळ मिळवून देण्यात यावा आणि मतदार संघात तालुका स्तरावर पीकविमा कंपनीचे कार्यालय सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने समाचार घेतला जाईल असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.सोबतच ग्रामीण भागात प्रजन्यमापक यंत्र मोकळ्या जागेत लावून कार्यान्वित करावे असेही ते म्हणाले.
बैठकीत पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना झापले
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकताच जिल्ह्यातील अतिवृष्टीचा पाहणी दौरा करून आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना झापले होते. पीककर्ज आणि पिकविम्यासाठी बँका आणि कंपन्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असा सज्जड दम सुद्धा भरला होता. तसेच यावेळी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली होती. कृषीमंत्र्यांच्या सुचनेनंतर सुद्धा निगरगट्ट विमा कंपन्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.